आधी दारुण पराभव, आता बिहारमध्ये महाआघाडीत पडणार फूट, हा मित्रपक्ष साथ सोडणार, NDAत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:46 IST2025-11-21T14:46:00+5:302025-11-21T14:46:37+5:30
Bihar Assembly Election News: नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या दारुण पराभवानंतर आता महाआघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

आधी दारुण पराभव, आता बिहारमध्ये महाआघाडीत पडणार फूट, हा मित्रपक्ष साथ सोडणार, NDAत जाणार
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या दारुण पराभवानंतर आता महाआघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. महाआघाडीमधील घटक पक्ष असलेल्या आयआयपीचे अध्यक्ष आय.पी. गुप्ता यांनी महाआघाडी सोडण्याचे संकेत दिले आहेत. आपल्याला एनडीएमधून फोन आला होता. तसेच आपण एका अटीवर एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.
आय. पी. गुप्ता एनडीएसोबत जाण्याबाबत म्हणाले की, मी एनडीएमध्ये दाखल होण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी माझी एक अट आहे. आमच्या तांती-ततवा समाजाला एससी प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं गेलं पाहिजे. हा निर्णय एनडीए सरकार घेऊ शकतं. तसेच आमची ही मागणी मान्य केली गेली तर मी कुठलाही वेळ वाया न घालवता एनडीएमध्ये प्रवेश करेन. बिहारमध्ये तांती-ततवा समाजाची लोकसंख्या ८० लाख ते १ कोटीच्या आसपास आहे, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान, आमच्या पक्षाचं पूर्ण मतदान महाआघाडीतील घटक पक्षांना मिळालं. माझ्या व्होटबँकेची कल्पना एनडीएला आहे. त्यामुळेच त्यांनी मला एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, बिहारमधील विधानसभा निवडणुकीत कुठे चूक झाली याचं आत्मपरीक्षण महाआघाडीतील पक्षांनी एकत्र बसून केलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.