Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:06 IST2025-12-30T18:04:48+5:302025-12-30T18:06:47+5:30
Narendra Modi And Shravan Singh : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील १० वर्षांच्या शूर श्रवण सिंहने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय जवानांना पाणी, दूध आणि लस्सी पोहोचवून मदतीचा हात दिला होता.

Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील १० वर्षांच्या शूर श्रवण सिंहने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय जवानांना पाणी, दूध आणि लस्सी पोहोचवून मदतीचा हात दिला होता. या मोहिमेदरम्यान श्रवणने मोठं मन दाखवत देशाच्या शूरवीरांची मनापासून सेवा केली.
२६ डिसेंबर रोजी 'वीर बाल दिना'निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रवणला 'राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने सन्मानित केलं. या सोहळ्यात श्रवणने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवादही साधला. आपण मोठं होऊन काय बनणार? आणि जवानांची सेवा करण्यामागचा उद्देश काय होता? हे श्रवणने पंतप्रधानांना सांगितलं.
श्रवण सिंहने मोदींना सांगितलं की, "ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जेव्हा गावात जवान आले, तेव्हा मी त्यांची सेवा करण्याचा विचार केला. मी त्यांच्यासाठी पाणी, दूध, लस्सी, चहा घेऊन जात असे. जोपर्यंत ते जवान तिथे होते, तोपर्यंत मी त्यांची सेवा केली." जेव्हा मोदींनी श्रवणला विचारलं की, तुला हे कुठून सुचलं? तेव्हा तो म्हणाला की, "मला सेवा करण्याची आवड आहे आणि मोठं होऊन मला 'आर्मी ऑफिसर' बनायचं आहे."
"सोच सेवा की,
— Mulubhai Bera (@Mulubhai_Bera) December 27, 2025
जज्बा शेरो का"
बाल योद्धा श्रवण सिंह 🇮🇳 pic.twitter.com/aUpdQ7Kfa4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. यानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील २० मुलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं आहे.
आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "हे पुरस्कार विजेत्यांना प्रोत्साहन देतील आणि देशभरातील इतर मुलांनाही प्रेरणा देतील." राष्ट्रपती मुर्मू यांनी पुढे नमूद केलं की, पुरस्कार मिळालेल्या मुलांनी शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नाविन्य आणि विज्ञान-तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत विलक्षण योगदान दिलं आहे.