अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 08:59 AM2023-10-15T08:59:43+5:302023-10-15T09:01:52+5:30

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली.

Firefighter's death, family upset over not providing 'guard of honour'; Explanation of the army | अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

पंजाबमधील अग्निवीर जवानाला जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर वीरमरण आले. मात्र, अग्निवीर भरतीच्या नवीन नियमावलीनुसार या जवानास शहीद दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे, अंत्यसंस्कारावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात न आल्याने कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली. त्यावर, आता सैन्य दलाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अग्निवीर अमृतपाल सिंह यांचा मृत्यू स्वत: गोळी झाडून घेतल्याने झाला. त्यामुळे, नवीन नियमावलीनुसार त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नाही किंवा कुठलाही शहीद जवानांवरील सोपस्कार करण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण सैन्य दलाकडून देण्यात आले आहे. 

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू असल्याचंही सैन्याने म्हटलं आहे. अग्निवीर अमृतापल सिंह यांचे पार्थिव एका भाडे तत्त्वावरील रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आले. त्यावेळी, एक ज्युनियर कमीशंड अधिकारी व इतर ४ जवान पार्थिसवासोबत होते. मात्र, अंत्यसंस्कारावेळी हे जवानही उपस्थित नसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्यामुळे, अग्निवीर अमृतपाल सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली. 

याप्रकरणावरुन पंजाबमधील राजकीय नेत्यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही केंद्र सरकारला याप्रकरणी जाब विचारणार असल्याचं म्हटलं आहे. अमृतपाल सिंह यांच्या बलिदानासाठी सैन्याची नियमावली काहीही असो, मात्र आमचं सरकार शहीदांचा तोच सन्मान, स्मरण करेल. त्यानुसार, जवानाच्या कुटुंबीयांस १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. अमतृपाल सिंह हे देशाचे शहीद जवान आहेत, असे ट्विट भगवंत मान यांनी केले आहे. 


शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल यांनीही अमृतपाल यांच्या मृत्यूनंतर सैन्य दलाकडून न मिळालेल्या गार्ड ऑफ ऑनरमुळे नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष घालून सर्वच शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर दिला जावा, अशी मागणी केली आहे.  

दरम्यान, अमृतपाल सिंह हे पुँछ सेक्टरमधील जम्मू-काश्मीर रायफल्सच्या एका बटालियनमध्ये कार्यरत होते. शुक्रवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

Web Title: Firefighter's death, family upset over not providing 'guard of honour'; Explanation of the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.