दिल्लीत भंडाऱ्यासारखे अग्निकांड, रुग्णालयात ७ नवजातांचा कोळसा, १२ बालकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:15 AM2024-05-27T08:15:44+5:302024-05-27T08:16:16+5:30

रुग्णालय मालकाला अटक, न्यायदंडाधिकारी चौकशी

Fire like a warehouse in Delhi, 7 newborns in hospital, 12 children rescued | दिल्लीत भंडाऱ्यासारखे अग्निकांड, रुग्णालयात ७ नवजातांचा कोळसा, १२ बालकांची सुटका

दिल्लीत भंडाऱ्यासारखे अग्निकांड, रुग्णालयात ७ नवजातांचा कोळसा, १२ बालकांची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पूर्व दिल्लीच्या विवेक विहार भागातील एका खासगी बाल रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता बेबी केअर न्यू बॉर्न हॉस्पिटलला आग लागली आणि लगेचच ती शेजारच्या दोन  इमारतींत पसरली, असे दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भातील भंडारा शहरातदेखील तीन वर्षांपूर्वी अशाच एका घटनेत ११ बालकांचा मृत्यू झाला होता.

दिल्ली प्रशासनाने या दुर्घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले असून, पोलिसांनी रुग्णालयाच्या मालकाला अटक केली आहे. रुग्णालयातून १२ नवजात बालकांची सुटका करण्यात आली. तथापि, त्यातील सात जणांचा मृत्यू झाला, असे दिल्ली अग्निशमन सेवेचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले. पाच बाळांवर दुसऱ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील काहींना किरकोळ दुखापत झाली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे १६ बंब बोलवावे लागले, असे विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. 

आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात

इमारतीच्या बाहेर उभी करण्यात आलेली एक स्कूटी व रुग्णवाहिकेसह तळ मजल्यावरील एक दुकान, लगतच्या इमारतीतील एका बँकेचा एक भाग आणि दोन बुटीकचे नुकसान झाले, असे अन्य एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

काय आढळले पोलिस तपासात?

या खासगी बाल रुग्णालयाचा परवाना ३१ मार्च रोजीच संपुष्टात आला होता. तसेच नवजात बाळांवर अप्रशिक्षित डॉक्टर उपचार करीत होते. इतकेच नव्हे तर, इमारतीत अग्निरोधक यंत्रणा व आपातकालीन मार्ग नव्हते, असे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चाैकशीत आढळून आले आहे. 

बेकायदा ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग

इमारतीत अनधिकृत ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंगचे काम केले जाते. आम्ही स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार केली होती. पण, काहीही झाले नाही. हे सर्व पोलिसांच्या आशीर्वादाने होत आहे, असा आरोप स्थानिक रहिवासी मुकेश बन्सल यांनी केला. आधी मी रुग्णालयाच्या शेजारी राहत होतो. परंतु, सिलिंडर रिफिलिंगच्या बेकायदा कामामुळे पुढच्या गल्लीत राहायला गेलो, असेही ते म्हणाले. 

भंडाराच्या घटनेच्या कटू स्मृती झाल्या ताज्या

भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक ते तीन महिने वयोगटातील ११ बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दिल्लीतील या दुर्घटनेमुळे त्या घटनेची आठवण ताजी झाली. भंडाराच्या घटनेत १७ पैकी ६ बालकांना वाचवण्यात यश आले होते.

स्थानिक रहिवाशांमुळे काही बालके बचावली

स्थानिक लोक व शहीद सेवा दल या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य मदतीसाठी सर्वप्रथम धावून आले. काही रहिवाशांनी मागील बाजूने इमारतीवर चढून काही नवजात बालकांना वाचवले, असे स्थानिक रहिवासी रवी गुप्ता यांनी सांगितले. रुग्णालय इमारतीला आग लागताच रुग्णालयातील कर्मचारी पळून गेले, असा दावा स्वयंसेवी संस्थेच्या एका सदस्याने केला.

Web Title: Fire like a warehouse in Delhi, 7 newborns in hospital, 12 children rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.