भयंकर! रामनगरिया जत्रेत भीषण आग; 100 झोपड्या जळून खाक, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 11:00 IST2024-02-24T10:56:54+5:302024-02-24T11:00:53+5:30
रामनगरीया जत्रेला लागलेल्या आगीत यात्रेकरूंच्या सुमारे 100 झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच एका मुलाचा मृत्यू झाला असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद येथे सुरू असलेल्या रामनगरिया जत्रेत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत एका मुलाचा मृत्यू झाला. तर सहाहून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रामनगरीया जत्रेला लागलेल्या आगीत यात्रेकरूंच्या सुमारे 100 झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच एका मुलाचा मृत्यू झाला असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तीन जणांना हायर सेंटर सैफई येथे रेफर करण्यात आले आहे. इतरांना लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीनंतर झोपडीत ठेवलेल्या सिलिंडरचाही ब्लास्ट झाला आहे. या आगीत एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.
रामनगरिया जत्रा ही फारुखाबादमधील गंगेच्या तीरावर असलेल्या पांचाल घाटावर महिनाभर चालते. प्रयागराज आणि हरिद्वारनंतर फारुखाबादमध्ये गंगेच्या तीरावर अशा प्रकारची जत्रा आयोजित केली जाते. त्याला मिनी कुंभ असंही म्हणतात. या जत्रेत राज्यातील विविध जिल्ह्यातून लोक येत असतात.
पोलिस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जत्रेत आग लागली होती. पोलीस, वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत 7 जण जखमी झाले आहेत. एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे