मास्क न परिधान केल्यास 1 लाख रुपयांचा दंड, या सरकारचा कठोर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 15:02 IST2020-07-23T15:02:13+5:302020-07-23T15:02:31+5:30
झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.

मास्क न परिधान केल्यास 1 लाख रुपयांचा दंड, या सरकारचा कठोर निर्णय
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्यापही पुढील काही काळ मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टन्स हे गरजेचं असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच, केंद्र आणि सर्वच राज्यांच्या राज्य सरकारने मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. लॉकडाऊन आणि कोरोना रोगाचा प्रसार वाढ नये, यासाठी काळजी म्हणून नियमांचे कडेकोट पालन करण्याचे सरकारने बजावले आहे. त्याच पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत.
झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन सोरेन यांच्याकडून करण्यात आलंय. तसेच, राज्यातील सर्वच नागरिकांना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास अथवा मास्क परिधान न केल्यास 2 वर्षांची शिक्षा करण्यात येणार आहे. तसेच, याप्रकरणी मास्क न परिधान करणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. झारखंड संक्रमण रोग अध्यादेशानुसार यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनेक देशांनी अनिवार्य केलेला आहे. दरम्यान, आपल्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचा दावा करणारा उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशाह किम जोंग उन हा आता कोरोनाला चांगलाच घाबरला आहे. देशात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेऊन त्यानेही मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना कठोर शिक्षा देण्याची घोषणा केली आहे. जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या दीड कोटींच्या पुढे पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ६ लाख २१ हजार ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे.