"मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका"; अमित शाहांनी अखिलेश यादवांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:29 IST2025-07-29T14:28:37+5:302025-07-29T14:29:10+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाषण करताना जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची माहिती दिली.

"मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका"; अमित शाहांनी अखिलेश यादवांना सुनावलं
Amit Shah Parliament Session: संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती दिली. ऑपरेशन महादेवद्वारे तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले. श्रीनगरमधील दाचीगाम चकमकीत सुलेमान शाह उर्फ हाशिम मुसा आणि जिब्रान आणि अफगाणी या दहशवाद्यांना ठार करण्यात आलं. संसदेत अमित शाह माहिती देत असताना समाजावादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत त्यांच्या बाचाबाची झाली. दहशतवाद्यांचा धर्म पाहून तुम्ही दुःखी होऊ नका अशा शब्दात अमित शाह यांनी अखिलेश यादव यांना सुनावले. पाकिस्तानशी तुमचं बोलणं होतं का असाही सवाल अमित शाह यांनी केला.
जेव्हा अमित शाह ऑपरेशन महादेवची माहिती देत होते, तेव्हा अखिलेश यादव यांच्यासह संपूर्ण विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदीनी 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे दहशवाद्यांना पाठवणाऱ्यांनाही मारले आणि आपल्या सुरक्षा दलांनी पाठवलेल्यांनाही मारले असं म्हणताच अखिलेश यादव यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांचा आका आहे असं म्हटलं. त्यानंतर अमित शाह यांनी विचारलं की तुमच पाकिस्तानशी बोलणं होतं का असं म्हटलं. यावर अखिलेश यादव उभे राहिले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यादव यांना त्यांना बसण्यास सांगितले.
"मला अपेक्षा होती की जेव्हा विरोधकांना दहशतवाद्यांच्या मृत्युची बातमी कळेल तेव्हा विरोधी पक्षात आनंदाची लाट येईल, पण त्यांचे चेहरे दुःखाने भरलेले होते. त्यांना दहशतवाद्यांना मारल्याचा आनंदही नाही," असंही अमित शाह म्हणाले. त्यानंतर अखिलेश यादव यांना उद्देशून अमित शाह यांनी "दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका," असं म्हटलं.
"काल तुम्ही विचारत होता की दहशतवादी कुठून आले. जबाबदारी आमची आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मला विचारायचे आहे की तुम्ही सरकारमध्ये असताना जबाबदारी का घेतली नाही. काल देशाचे माजी गृहमंत्री चिदंबरम म्हणाले की दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय आहे, संसदेत चर्चा होणार असताना तुम्ही हे कधी उपस्थित केले. चिदंबरमसाहेब तुम्हाला काय म्हणायचे आहे, पाकिस्तानला वाचवून तुम्हाला काय मिळेल?," असाही सवाल अमित शाह यांनी केला.