दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:20 IST2025-11-10T20:19:19+5:302025-11-10T20:20:13+5:30
हरियाणातील फरीदाबाद, जम्मू-कश्मीर आणि गुजरातमध्ये मोठी कारवाई करत आणि पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे, ज्यात एका डॉक्टर कपलचाही समावेश आहे.

AI Generated Image
शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या नावाखाली देशात दहशतवादी कारवायांचे मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत उच्चशिक्षित डॉक्टरांच्या एका टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यात अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये डॉक्टरांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातील फरीदाबाद, जम्मू-कश्मीर आणि गुजरातमध्ये मोठी कारवाई करत आणि पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे, ज्यात एका डॉक्टर कपलचाही समावेश आहे.
लेडी डॉक्टरची 'खतरनाक' भूमिका!
या कारवाईतील सर्वात मोठा खुलासा फरीदाबाद आणि अनंतनाग पोलिसांनी संयुक्तपणे केला आहे. त्यांनी डॉ. मुजम्मिल शकील याला अटक केली, जो अल-फलाह युनिव्हर्सिटीत शिकवत होता. त्याच्या अटकेनंतर आज त्याची गर्लफ्रेंड मानली जाणारी डॉ. शाहीन शाहिद हिलाही जम्मू-कश्मीर पोलिसांनी अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, मूळची लखनऊची असलेली डॉ. शाहीन शाहिद हिच्या कारमधून एके-४७सारखे अत्यंत खतरनाक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. याच गाडीचा वापर मुजम्मिल शकील करत असे. शाहीनचे थेट संपर्क पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी होते. तिच्यावर जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवत-उल-हिंद यांसारख्या खतरनाक संघटनांशी जोडले गेल्याचा गंभीर आरोप आहे.
अल-फलाह युनिव्हर्सिटी 'टेरर-हब'?
या दहशतवादी मॉड्यूलचे कनेक्शन फरीदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटी पर्यंत पोहोचले आहे. डॉ. मुजम्मिल शकील याच विद्यापीठात शिकवत होता, तर डॉ. शाहीन शाहिद हीसुद्धा आरोग्य सेवा किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या निमित्ताने इथे सक्रिय होती. तपास यंत्रणा आता लखनऊ, अलीगढ, दिल्ली आणि जम्मू-कश्मीर या दरम्यान सक्रिय असलेल्या या संपूर्ण नेटवर्कचा मागोवा घेत आहेत. आगामी काळात आणखी काही संशयितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
एका नव्हे, दोन ठिकाणी स्फोटकांचा महाकाय साठा
या मॉड्यूलच्या माध्यमातून देशात मोठी घातपाती कारवाई घडवण्याची तयारी सुरू होती. डॉ. मुजम्मिल शकील याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धौज गावात मोठी कारवाई करत त्याच्या रुमपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका घरातून तब्बल ३६० किलो अमोनियम नायट्रेट स्फोटक साठा जप्त केला. हा स्फोटक साठा फक्त १५ दिवसांपूर्वीच मुजम्मिल शकीलपर्यंत पोहोचला होता.
स्फोटकं आठ मोठ्या आणि चार छोट्या सूटकेसमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. त्याच्या रुममधून वॉकी-टॉकी, २० टाइमर, २० बॅटरी, घड्याळे आणि क्रिंकोव असॉल्ट रायफल, पिस्तूल व मॅगझिन असा जखीराही मिळाला.
आजच्या कारवाईत आणखी एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला. डॉ. मुजम्मिलच्याच माहितीवरून फरीदाबादच्या फतेहपूर तगा गावातील एका घरातून तब्बल २,५६३ किलोग्राम संशयास्पद स्फोटक जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे घर हाफिज इश्तियाक नावाच्या एका मौलानाचे आहे. हा मौलाना धौज गावातील मशिदीचा इमाम आहे. पोलिसांनी तातडीने मौलाना हाफिज इश्तियाकला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.