निकालांआधीच आमदार फुटण्याची भीती, हिमाचलमध्ये गोव्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी काँग्रेसची खास रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:55 IST2022-12-07T13:55:00+5:302022-12-07T13:55:53+5:30
Himachal pradesh assembly Election Result : हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीच्या लढतीच्या भाकितामुळे आमदारांची संभाव्य फुटाफूट आणि ऑपरेशन लोटससारखे प्रयोग टाळण्यासाठी काँग्रेसने खास रणनीती आखली आहे. तसेच काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना राजस्थानमध्ये पाठवण्याची शक्यता आहे.

निकालांआधीच आमदार फुटण्याची भीती, हिमाचलमध्ये गोव्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी काँग्रेसची खास रणनीती
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. या निकालांपूर्वी आलेल्या एक्झिट पोलमधून गुजरातमध्ये भाजपाचा विजय तर हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीच्या लढाईचं भाकित केलं जात आहे. दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तनाचा ट्रेंड असल्याने हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी सत्ता मिळेल अशी काँग्रेसला आशा आहे. मात्र अटीतटीच्या लढतीच्या भाकितामुळे आमदारांची संभाव्य फुटाफूट आणि ऑपरेशन लोटससारखे प्रयोग टाळण्यासाठी काँग्रेसने खास रणनीती आखली आहे. तसेच काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना राजस्थानमध्ये पाठवण्याची शक्यता आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना याबाबतची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही या सर्वावर लक्ष ठेवून आहेत. त्या आज सिमला येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि सिमलामधील आमदार विक्रमादित्य यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशमध्ये मेघालय आणि गोव्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. निवडणुकीच्या निकालांनंतर आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेलं जाईल. हिमाचल प्रदेशच्या जमिनीवर घोडेबाजार भरू दिला जाणार नाही. भाजपाने कुठलीही योजना आखली, संस्थांचा वापर केला, किंवा खरेदी-विक्रीचा प्रयत्न केला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीत आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवू.
दरम्यान, विविध एक्झिट पोलमधून हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीच्या लढतीचं भाकित करण्यात आलं आहे. तसेच ६८ जागा असलेल्या विधानसभेत दोघांपैकी एका पक्षाला काठावरचं बहुमत मिळेल, असं भाकित करण्यात येत आहे. तर इंडिया टुडेच्या एक्झिट पोलने मात्र राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला ३० ते ४० तर भाजपाला २४ ते ३४ जागा मिळतील असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.