धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:08 IST2025-05-13T03:08:07+5:302025-05-13T03:08:20+5:30
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये अजूनही शेकडो न फुटलेल्या जिवंत बॉम्बचा धोका कायम आहे.

धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : शस्त्रसंधीनंतर लगेच लष्कर आणि पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेले व स्फोट न झालेले अनेक बॉम्ब नष्ट करण्याचे काम झपाट्याने सुरू केले आहे. बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील सहा गावांमध्ये जिवंत बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर तेथील रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये अजूनही शेकडो न फुटलेल्या जिवंत बॉम्बचा धोका कायम आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमलकोट, मधान, गौहलान, सलामाबाद (बिजहामा), गंगरहिल आणि गवाल्टा या गावांमध्ये सात न फुटलेले बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले. या सहा गावांमधून स्थलांतरित झालेल्या लोकांना आता परतण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पंजाबच्या सीमेजवळ बॉम्ब सापडल्याने खळबळ
शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर सीमेलगतच्या जिल्ह्यांत स्थिती सुधारत असली तरी पंजाबमध्ये मात्र अजूनही तणाव कायम आहे. पाकिस्तान सीमेलगत असलेल्या फाजिल्का जिल्ह्यातील मुठियांवाली गावात रविवारी रात्री उशिरा एक बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती. पंजाबमधील पाच जिल्हे वगळता इतर १८ जिल्ह्यांतील शाळा सोमवारी सुरू करण्यात आल्या आहेत.
रात्र गेली शांततेत
जम्मू विभागातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये काल रात्री शांतता होती. कोणतीही ड्रोन हालचाल, गोळीबार, तोफगोळ्याचा प्रकार आढळून आला नाही. लष्कर व सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, एलओसी व आंतरराष्ट्रीय सीमेवर ‘हाय अलर्ट’ कायम आहे. उरी, कुपवाडा, पूंछ, राजौरी, जम्मू, सांबा, कठुआ आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये घुसखोरी किंवा गोळीबाराची नोंद झाली नाही.