एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:01 IST2025-11-22T08:46:56+5:302025-11-22T09:01:53+5:30
दिवंगत विंग कमांडर नमांश सियाल यांचे वडील म्हणाले, "संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास, मी युट्यूबवर एअर शोचे व्हिडीओ शोधत होतो तेव्हा मला विमान अपघाताची बातमी दिसली. मी ताबडतोब माझ्या सुनेला फोन केला, ती देखील विंग कमांडर आहे."

एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
दुबई एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमान अपघातात विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला. नमांश यांचे वडील जगन्नाथ सियाल हे त्यांच्या मुलाच्या एअर-शोचे व्हिडीओ YouTube वर शोधत होते तेव्हा त्यांना अपघाताची बातमी मिळाली, यामध्ये त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. सियाल कुटुंब हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पटियालकड गावचे रहिवासी आहे. विंग कमांडरचे वडील निवृत्त शाळेचे मुख्याध्यापक आहेत. "मी गुरुवारी माझ्या मित्राशी बोलत होतो. त्यांनी मला टीव्ही किंवा YouTube वर दुबई एअर शोमध्ये त्याचा परफॉर्मन्स पाहण्यास सांगितले, असे कमांडर यांच्या वडीलांनी सांगितले.
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
दिवंगत विंग कमांडर नमांश सियाल यांचे वडील म्हणाले, " ४ वाजताच्या सुमारास, मी युट्यूबवर एअर शोचे व्हिडीओ शोधत होतो तेव्हा मला विमान अपघाताची बातमी दिसली. मी ताबडतोब माझ्या सून, जी विंग कमांडर देखील आहे, तिला फोन केला. काही वेळाने, किमान सहा हवाई दलाचे अधिकारी आमच्या घरी आले आणि मला समजले की माझ्या मुलासोबत काहीतरी भयंकर घडले आहे."
हे कुटुंब सध्या तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे आहे. नमन यांची पत्नी कोलकाता येथे प्रशिक्षण घेत असल्याने, ते दोन आठवड्यांपूर्वी हिमाचलहून त्यांची ७ वर्षांची नात आर्या सियाल हिची काळजी घेण्यासाठी येथे आले होते. नमांश यांची आई वीणा सियाल या धक्क्यात आहेत, त्या बोलू शकत नाहीत.
लढाऊ विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला
दुर्घटनेच्या व्हिडीओ फुटेजमध्ये लढाऊ विमान अचानक उंचीवरून कोसळताना आणि नंतर आगीच्या गोळ्यात दिसत होते. दुबई वर्ल्ड सेंट्रल येथील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळा धुराचे लोट पसरले होते. कुंपण घातलेल्या धावपट्टीच्या मागे विस्तीर्ण स्टँडमध्ये घाबरलेले प्रेक्षक जमले होते. भारतीय हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, "या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे भारतीय हवाई दलाला खूप दुःख झाले आहे आणि या दुःखाच्या वेळी शोकग्रस्त कुटुंबासोबत एकता आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन केले जात आहे.