दिल्ली स्फोट प्रकरणातील संशयित मुलांना भेटू दिलं नाही; कुलगाममध्ये वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:34 IST2025-11-17T15:31:24+5:302025-11-17T15:34:10+5:30
दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.

दिल्ली स्फोट प्रकरणातील संशयित मुलांना भेटू दिलं नाही; कुलगाममध्ये वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Jammu Kashmir:दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये संशयितांची धरपकड सुरु आहे. चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. कुलगाम येथे मुलाला पोलीस कोठडीत भेटण्याची परवानगी न मिळाल्याने वडिलांनी स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
बिलाल अहमद वाणी असे या वडिलांचे नाव असून, ते सुकामेवा विकण्याचा व्यवसाय करतात. रविवारी त्यांनी कुलगाममध्ये स्वतःला आग लावून घेण्याचा प्रयत्न केला. गंभीररित्या भाजलेल्या बिलाल वानी यांना तातडीने अनंतनागच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात पोलिसांनी वाणी आणि त्याचा मुलगा जसीर बिलाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. वाणीला नंतर सोडण्यात आले तर त्याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात ठेवण्यात आलं.
मेहबूबा मुफ्तींचे पोलिसांवर गंभीर आरोप
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मेहबूबा यांनी बिलाल वानी यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, "पोलीस कोठडीत असलेल्या आपल्या मुलाला, जसीर बिलाल आणि भाऊ नवीद वानी यांना भेटण्याची विनंती अधिकाऱ्यांनी वारंवार फेटाळल्यामुळे या दुःखी वडिलांनी स्वतःला आग लावून घेतली," असं म्हटलं.
मुफ्ती पुढे म्हणाल्या की, "त्यांनी (बिलाल वानी यांनी) अधिकाऱ्यांपुढे वारंवार मुलाला भेटू देण्याची विनवणी केली, पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. अनियंत्रितपणे आणि मनमानी पद्धतीने होत असलेल्या अशा कारवाईमुळे जखमा आणखी वाढतात." मेहबूबा मुफ्ती यांनी पोलिसांना मानवता दाखवत बिलाल वानी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याचे आवाहन केले आहे.
दिल्लीस्फोटानंतर धरपकड
१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १३ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी काश्मीर खोऱ्यात ६०० हून अधिक स्थानिक लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये बिलाल वानी यांचा मुलगा जसीर याचाही समावेश आहे. बिलाल वाणी आणि त्यांची दोन मुले ज्या ठिकाणी राहतात त्याच्या जवळच डॉ. अदील राठेरचे घर आहे. डॉ. अदीलला ६ नोव्हेंबर रोजी दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्या लॉकरमधून पोलिसांना रायफलही मिळाली होती. याच प्रकरणात डॉ. अदीलचा भाऊ डॉ. मुजफ्फर राठेर हा देखील आरोपी आहे, जो सध्या दुबईत असल्याचे मानले जाते.