Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:31 IST2025-12-17T11:30:14+5:302025-12-17T11:31:10+5:30
Video - वडिलांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ६० फूट खोल बोरवेलमध्ये उडी मारली.

Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
अहमदाबादच्या चांदलोडियामधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ६० फूट खोल बोरवेलमध्ये उडी मारली. १५ डिसेंबरच्या रात्री गजराज सोसायटीमधील जैन देरासरजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे नागरिक भावूक झाले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सर्वजण वडिलांच्या धैर्याला सलाम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एका चिमुरडीचा पाय अचानक घसरला आणि ती पाण्याने भरलेल्या खोल बोरवेलमध्ये पडली. आपल्या मुलीला डोळ्यांदेखत बोरवेलमध्ये पडताना पाहून वडील घाबरले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी थेट बोरवेलमध्ये उडी मारली. लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे मोठा जमाव जमा झाला. उपस्थितांनी वडील आणि मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बोरवेलमध्ये खूप खोल असल्याने आणि त्यात पाणी असल्याने त्यांना बाहेर काढणं कठीण झालं होतं.
बेटी बोरवेल में गिरी तो पिता ने भी लगा दी छलांग... यमराज से छीने अपनी लाडली के प्राण...#Gujarat#Borewell#BorewellHole#Chandlodiya#Chandlodiapic.twitter.com/kqFW4zMH3g
— Sambhava (@isambhava) December 17, 2025
अग्निशमन दलाचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली. तोपर्यंत बाप-लेक पाण्यात बुडण्याची भीती वाढत चालली होती. आजूबाजूचे लोक देवाकडे प्रार्थना करत होते. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. सुमारे २० मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर वडील आणि मुलगी दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
दोघांवर उपचार सुरू
बाहेर काढल्यानंतर दोघांनाही तातडीने सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, वेळेवर बचावकार्य झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना केवळ पित्याचे निस्वार्थ प्रेमच दर्शवत नाही, तर उघड्या आणि असुरक्षित बोरवेल संदर्भात प्रशासन आणि समाजाच्या जबाबदारीवरही मोठं प्रश्नचिन्ह उभं करतं.