कंटेनर आणि चार चाकीचा भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:59 IST2024-12-10T17:59:25+5:302024-12-10T17:59:45+5:30
Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे एक कंटेनर आणि मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेमध्ये मॅजिक गाडीमधील ७ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत.

कंटेनर आणि चार चाकीचा भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे एक कंटेनर आणि मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेमध्ये मॅजिक गाडीमधील ७ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या मदतीसाठी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
हा अपघात हाथरस जंक्शन ठाण्याच्या हद्दीतील बरेली-मथुरा मार्गावरील जैतपूर गावाजवळ झाला. आज दुपारच्या सुमारास एका कंटेनरने प्रवाशांनी भरलेल्या मॅजिक गाडीला धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की त्यात मॅजिक गाडीचा चेंदामेंदा झाला. तसेच ही गाडी उलटून एका खड्ड्यात जाऊन पडली. तसेच त्यामधून प्रवास करत असलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तिथे धाव घेतली. तसेच जखमींना बाहेर काढले. दरम्यान, घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर एका महिलेने उपचारांदरम्यान, प्राण सोडले.
मिळालेल्या माहितीनुसार मॅजिकमधून प्रवास करत असलेले २० जण हे चंदपा क्षेत्रातील कुम्हरई गावातील रहिवासी होतो. तसेच कर्करोगाने पीडित असलेल्या आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी एटा येथील नगला इलमिया गावात जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला.