पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:11 IST2025-08-15T12:10:48+5:302025-08-15T12:11:22+5:30

Bus Truck Collision In West Bengal : पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. तर ३० जण जखमी झाले आहेत.

Fatal accident between truck and bus in West Bengal, 10 dead, 30 injured | पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी

पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी

पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात बस आणि ट्रकमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. तर ३० जण जखमी झाले आहेत. भरधाव बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. तसेच अनेक प्रवासी बसमध्ये अडकले.

स्थानिक लोकांनी या अपघाताची माहिती त्वरित पोलिसांना दिली. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेतून वर्धमान मेडिकल कॉलेज आणि इतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार ट्रक रस्त्यावर उभा होता. मात्र या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी  अपघाताचं कारण जाणून घेण्यासाठी स्थानिकांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वर्धमान जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने बसला ट्रकपासून वेगळं करण्यात आलं आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.

ट्रक रस्त्यावर कुठलीही सूचना न देता उभा करणे आणि मागून येणाऱ्या बसचा भरधाव वेग हे या अपघाताचे मुख्य कारण असावे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून, अपघाताचं कारण जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.  

Web Title: Fatal accident between truck and bus in West Bengal, 10 dead, 30 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.