शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती खालावली; तीन आठवड्यांत दोन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:20 IST2025-01-10T12:18:43+5:302025-01-10T12:20:56+5:30
अकरा महिन्यांपासून सुरू आहे आंदोलन

शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती खालावली; तीन आठवड्यांत दोन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
पटियाला: हरयाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. तीन आठवड्यांत आंदोलनस्थळी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती गुरुवारी शेतकरी नेत्यांनी दिली. यापूर्वी १८ डिसेंबर रोजी शंभू सीमेवर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.
आंदोलनस्थळी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव रेशम सिंग असून, ते तरणतारण जिल्ह्यातील पाहुविंड येथील रहिवासी आहेत. रेशम सिंग यांनी विष सेवन केल्याचे समजल्यानंतर त्यांना उपचारासाठी पटियाला येथील राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार चर्चा करत नसल्यामुळे रेशम सिंग नाराज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले.
अकरा महिन्यांपासून सुरू आहे आंदोलन
- तीन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेत शेतीमालाला एमएसपी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नाही.
- त्यामुळे १३ फेब्रुवारी २०२४ पासून पंजाब व हरयाणाच्या शेतकऱ्यांनी शंभू व खानौरी सीमेवर सुरू केलेल्या आंदोलनाला अकरा महिने पूर्ण होत आहेत.
शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांचे २६ नोव्हेंबरपासून खानौरी सीमेवर आमरण उपोषण सुरू आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून उपोषण सुरू असल्याने डल्लेवाल यांची प्रकृती जास्त बिघडली आहे. डल्लेवाल यांची प्रकृती खालावत चालल्याने रेशम सिंग व्यथित झाले होते.