एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:56 IST2025-11-12T08:50:21+5:302025-11-12T08:56:29+5:30
दिल्लीतील स्फोटाचा संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात असून याप्रकरण शाहीन शाहिद या महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
Jaish Woman Commander Shaheen Shahid: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाने देशाला हादरवून सोडलं आहे. यात १३ जणांचा मृत्यू झाला आणि २४ जण गंभीर जखमी झाले. गृहमंत्रालयाने तपास एनआयएकडे सोपवल्यानंतर तपास अधिक तीव्र झाला आहे. इतर गुप्तचर संस्थाही आपापल्या पद्धतीने तपास करत आहेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही, पण डॉक्टरांच्या एका मॉड्यूलने या पेक्षा मोठा कट रचल्याचे समोर आलं आहे. या दहशतवादी डॉक्टरांमध्ये शाहीन शाहिद नावाची एक महिला डॉक्टर देखील आहे. पोलिसांनी तिच्या कारमधून एके-४७ रायफल जप्त केली आहे. अटकेनंतर डॉक्टर शाहीनचे महाराष्ट्राशी देखील कनेक्शन असल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी तिचा निकाह झाला होता. शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याने इथल्या यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत.
लखनऊ ते फरिदाबाद पर्यंत पसरलेल्या एका मोठ्या कटात उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने डॉ. शाहीन शाहिदच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे पुरावे शोधून काढले. फरिदाबादमध्ये स्फोटके आणि शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मिल याच्या खुलाशानंतर शाहीनचे नाव समोर आले लखनऊमधील तिच्या घरी तसेच तिच्या भावाच्या आणि वडिलांच्या घरावर छापे टाकण्यात आले. पथकांनी कुटुंबातील सदस्यांची वेळा चौकशी केली आणि विविध डिजिटल आणि कागदोपत्री साहित्य जप्त केले.
सोमवारी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिल्ली दहशतवादी हल्ल्यामागील कट रचल्याप्रकरणी फरिदाबाद येथून शाहीन शाहिद या महिला डॉक्टरला अटक केली. डॉ. शाहीन शाहिद ही सामान्य डॉक्टर नसून कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालय मधील माजी प्राध्यापक आहे. जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेशी तिचे संबंध आहेत का याचीही चौकशी केली जात आहे. पोलिस तपासात असे दिसून आले की ती भारतात महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करण्याची योजना आखत होती. महाविद्यालयीन नोंदींनुसार, २०१३ पासून ती सूचना न देता गैरहजर राहू लागली, ज्यामुळे २०२१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तिला सेवेतून काढून टाकले. तिची २००९-१० मध्ये कन्नौज येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली होती. शाहीन सुरुवातीपासूनच वारंवार गायब होत असे. फिरोजाबादमध्ये झालेल्या कारवाईदरम्यान, शाहीनबद्दल संशयास्पद माहिती आढळून आली, ज्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नोंदींची पुन्हा तपासणी करण्यात आली.
डॉ. मुझम्मिलला फरीदाबादमध्ये अटक केल्यानंतर जप्त केलेल्या कारमध्ये स्फोटके आणि एके-४७ सह शस्त्रे आढळली. चौकशीदरम्यान मुझम्मिलने सांगितले की शाहीन ही त्याची ओळखीची होती आणि काही काळापूर्वीच त्याच्या संपर्कात आली होती. या माहितीच्या आधारे, शाहीनला ताब्यात घेण्यात आले आणि तपास सुरू झाला. शाहीनचा भाऊ परवेझ याने सहारनपूरमध्ये शाहीनच्या नावाने एक कार खरेदी केली होती असे तपासात उघड झाले. या वाहनाचा स्फोटके नेण्यासाठी वापर करण्यात आल्याचा संशय आहे.
महाराष्ट्र कनेक्शन समोर
डॉ. शाहीन शाहिदचे वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त राहिले आहे. तिचा निकाह महाराष्ट्रातील डॉ. जफर सईद याच्याशी झाला. मात्र २०१५ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर, त्या लखनऊमध्ये राहू लागली. घटस्फोटानंतर तिची भेट डॉ. मुझम्मिल शकील याच्याशी झाली, ज्यांना फरीदाबादमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या माहितीवरून पोलिसांना मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. डॉ. मुझम्मिल शकील आणि डॉ. शाहीन शाहिद हे भागीदार बनले. डॉ. मुझम्मिलने शाहिनची कार वापरली. अटकेदरम्यान, शाहिनच्या कारमधून एके-४७ रायफल, जिवंत दारूगोळा आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले.