मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:04 IST2026-01-08T18:59:44+5:302026-01-08T19:04:20+5:30
Delhi Turkman Gate Violence: तुर्कमान गेट परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या भीषण हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली.

मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
तुर्कमान गेट परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या भीषण हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली. गुरुवारी पोलिसांनी आणखी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. मशिदीबाबत अफवा पसरवून जमावाला चिथावणी दिल्याचा संशय पोलिसांना असून, आता या प्रकरणाची व्याप्ती राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
गुरुवारी अटक करण्यात आलेल्यांमध्ये अफान, आदिल, शाहनवाज, हमजा, अतहर आणि उबेद या स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री रामलीला मैदान परिसरातील फैज-ए-इलाही मशिदीजवळ महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यावेळी सुमारे ३६,००० चौरस फूट अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र, 'मशीद पाडली जात आहे' अशी खोटी अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली. यामुळे १५० ते २०० लोकांचा हिंसक जमाव जमा झाला आणि त्यांनी पोलीस तसेच मनपा कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक तसेच काचेच्या बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका एसएचओसह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले.
पोलीस तपास सुरू
या हिंसाचाराचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस सीसीटीव्ही, ड्रोन, पोलिसांचे बॉडीकॅम आणि सोशल मीडियावरील एकूण ४५० व्हिडिओ फुटेजची तपासणी सुरू आहे. ४ ते ५ व्हॉट्सॲप ग्रुप आणि १० सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून अफवा पसरवल्या गेल्याचे समोर आले. जुन्या धार्मिक आणि मित्र गटांमध्ये हे चिथावणीखोर मेसेज फॉरवर्ड करण्यात आले. सध्या सुमारे ३० लोक पोलिसांच्या रडारवर आहेत.
मशिदीला धक्का नाही, मनपाचे स्पष्टीकरण
दिल्ली महानगरपालिकेचे उपायुक्त कुमार कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, कारवाई केवळ डायग्नोस्टिक सेंटर, बँक्वेट हॉल आणि सरंक्षण भिंतींवर करण्यात आली. मशिदीला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तैनातीमुळे सध्या परिसरात शांतता असून अतिरिक्त पोलीस आयुक्त निधीन वलसन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.