CAA Protest : मोदी-शाह समर्थनाची 'ती' ट्विट नीता अंबानींची नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 21:30 IST2019-12-20T21:26:11+5:302019-12-20T21:30:17+5:30
Citizen Amendment Act : नीता अंबानींच्या नावानं ट्विट्स व्हायरल

CAA Protest : मोदी-शाह समर्थनाची 'ती' ट्विट नीता अंबानींची नाहीत!
मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या आंदोलनं सुरू असून काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांच्या नावानं काही ट्विट्स व्हायरल झाली आहेत. मात्र ही व्हायरल झालेली ट्विट्स बनावट खात्यावरुन करण्यात आल्याची माहिती रिलायन्सकडून देण्यात आली आहे. नीता अंबानींचं स्वत:चं ट्विटर खातंच नसल्याचंदेखील रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.
सुधारित नागरिक कायद्याविरोधात सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. सोशल मीडियावरदेखील या कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. त्यातच अचानक नीता अंबानींच्या नावानंदेखील काही ट्विट्स व्हायरल झाली आहेत. 'मोदीजी आणि मोटाभाई तुम्ही देशहिताच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेत राहा. तुम्हालाच मत देऊ. विरोधकांना नाही.' 'देशाला अंतर्गत शत्रूंपासूनच धोका आहे. बाहेरच्यांना लष्कर प्रत्युत्तर देईल. देशवासीयांनो, तुम्ही देशांतर्गत शत्रूंना ओळखा,' अशी काही ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. मोदी शहांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहा. अन्यथा कोणीही असे निर्णय घेण्याचं धाडस करणार नाही, असं आवाहनदेखील नीता अंबानींच्या नावानं करण्यात आलेल्या ट्विट्समधून करण्यात येत आहे.
नीता अंबानींच्या नावानं व्हायरल झालेली ट्विट्स बोगस असल्याची माहिती रिलायन्सनं म्हटलं आहे. 'नीता अंबानी यांच्या कथित ट्विटर हँडलवरून अनेक बनावट ट्विट्स करण्यात आल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. मात्र नीता अंबानी यांच्याकडे कोणतंही अधिकृत ट्विटर हँडल नाही. त्यांचं नाव किंवा छायाचित्रं असलेली सर्व ट्विटर खाती बनावट आहेत. कोणत्याही बनावट ट्विटर हँडलवरून जाणीवपूर्वक प्रसारित केल्या जाणाऱ्या ट्विट्सकडे कृपया दुर्लक्ष करावं. कथित ट्विटर हँडल निलंबित करण्यात आलेलं आहे', असं निवेदन रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.