फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 06:31 IST2025-08-22T06:31:03+5:302025-08-22T06:31:38+5:30
राधाकृष्णन यांना मते देण्याची केली विनंती

फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली.
भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या सर्व खासदारांनी त्यांना मत द्यावे अशी विनंती त्यांनी केली.
पवार, ठाकरेंकडे मिळून २१ मते
१. महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे लोकसभा व राज्यसभा मिळून ३८ खासदार आहेत. दुसरीकडे महायुतीचे २९ खासदार आहेत. महाराष्ट्रातून राधाकृष्णन यांना जास्तीतजास्त मते मिळावीत हा फडणवीस यांचा प्रयत्न आहे.
२. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गुरुवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या दोन नेत्यांनी फडणवीस यांना कसा प्रतिसाद दिला याची माहिती मिळू शकली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत ८ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. दोघांची मिळून तब्बल २१ मते आहेत. ती मिळविण्याच्या हालचाली फडणवीस यांनी आता सुरू केल्या आहेत.
३. काँग्रेसकडे लोकसभेत १४ व राज्यसभेत ३ अशी १७ मते आहेत. मविआकडील ३८ पैकी एकही मत फुटू नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत.