कुत्र्याच्या अंत्यसंस्कारासाठी तुरुंगातून सवलत, सुरतमधील प्रकरणात उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:23 IST2026-03-16T12:22:46+5:302026-03-16T12:23:25+5:30
आरोपीला पोलिसांच्या सुरक्षा ताफ्यासह त्याच्या घरी नेण्यात यावे व अंत्यसंस्कारानंतर त्याला पुन्हा तुरुंगात परत आणावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

कुत्र्याच्या अंत्यसंस्कारासाठी तुरुंगातून सवलत, सुरतमधील प्रकरणात उच्च न्यायालयाचे निर्देश
डॉ. खुशालचंद बाहेती -
नवी दिल्ली : गुजरात हायकोर्टाने मानवीय संवेदनांना महत्त्व देत न्यायालयीन कोठडीतील आरोपीला त्याच्या पाळीव कुत्र्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. आरोपीला पोलिसांच्या सुरक्षा ताफ्यासह त्याच्या घरी नेण्यात यावे व अंत्यसंस्कारानंतर त्याला पुन्हा तुरुंगात परत आणावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
फसवणुकीच्या प्रकरणात सुरत येथील एकजण न्यायालयीन कोठडीत लाजपोर कारागृहात आहे. त्याने यापूर्वी कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली. नंतर त्याने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले व विशेष परवानगीची मागणी केली. त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने गेल्या १४ वर्षांपासून एक पाळीव कुत्रा सांभाळला होता. त्याचा नुकताच मृत्यू झाला. आरोपीचा त्या पाळीव प्राण्याशी अतिशय भावनिक संबंध होता आणि त्याला त्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी व्हायचे आहे.
दुर्मीळ प्रकरण
भारतामध्ये मानवीय कारणांवरून कैद्यांना निकटच्या नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी न्यायालये तात्पुरती सवलत देत असतात. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी किंवा दोषींना आई-वडील किंवा इतर नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पॅरोल किंवा कस्टडी पॅरोल देण्यात आली आहे.
मात्र, पाळीव प्राण्याच्या अंत्यसंस्कारासाठी अशी परवानगी देण्याची प्रकरणे तुलनेने दुर्मीळ मानली जात आहेत. न्यायालयाने मानवीय पैलूचा विचार करून आरोपीला मर्यादित दिलासा दिला. न्यायालयाने सुरत पोलिसांना निर्देश दिले की, आरोपीला पोलिस एस्कॉर्टसह त्याच्या घरी नेण्यात यावे, जेणेकरून तो कुत्र्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकेल.