EVM-VVPAT pass or fail? Big information came out about verifying votes | EVM-VVPAT पास की नापास? मतांच्या पडताळणीबाबत समोर आली मोठी माहिती

EVM-VVPAT पास की नापास? मतांच्या पडताळणीबाबत समोर आली मोठी माहिती

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीन वरून मोठा गोंधळ झाला होता. तसेच संशयाला वाव राहू नये म्हणून 50 टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पडताळणीबाबत मोठी माहिती समोर आली असून, संपूर्ण देशभरात करण्यात आलेल्या मतांच्या पडताळणीत केवळ 0.0004%  ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांमध्ये फरक असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

संपूर्ण देशात केवळ 8 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये अंतर असल्याचे दिसून आले. मेघालयमधील शिलाँग मतदारसंघातील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये 34 मतांचे अंतर दिसून आले. देशभरात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील हा सर्वात मोठा फरक ठरला आहे.  

आंध्र प्रदेशमधील राजमपेट मतदान  केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात मतांचा फरक दिसून आला. हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एका मताचा फरक दिसून आला.  राजस्थानमधील चित्तौडगड आणि पाली लोकसभा मतदारसंघातील एकेका मतदान केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये एका मताचा फरक दिसून आला. मणिपूरमध्ये दोन ठिकाणी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक दिसून आला. यातील एका ठिकाणी एक तर दुसऱ्या ठिकाणी दोन मतांचा फरक होता. 

 दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक का दिसून आला याचा तपास करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विविध राज्यांमधील मुख्य निवडणूक अधिकारी निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांची माहिती गोळा करत आहेत. '' आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार आतापर्यंत निवडणूक निकालांना आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झालेल्या नाहीत. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची जुळणी न झाल्याची आठ प्रकरणे समोर आली आहेत. लवकरच आम्ही त्याचा तपास करू.'' असे निवडणूक आयोगामधील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

 निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकलनानुसा एकूण 20 हजार 687 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ 0.0004 टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक दिसून आला. दरम्यान, काही मानवी चुकांमुळे हा प्रकार घडला, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. तसेच मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी इव्हीएममधून मॉक पोलचा डेटा डिलीट न केल्याने मतामध्ये फरक पडला असावा, असा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे.   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: EVM-VVPAT pass or fail? Big information came out about verifying votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.