"चिंता करण्याची गरज नाही, भारत पूर्णपणे...", चीनमध्ये पसरलेल्या HMPV बाबत आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 08:53 IST2025-01-05T08:52:38+5:302025-01-05T08:53:31+5:30
HMPV Virus : आरोग्य मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, भारताची मजबूत देखरेख ठेवणारी यंत्रणा आणि आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत.

"चिंता करण्याची गरज नाही, भारत पूर्णपणे...", चीनमध्ये पसरलेल्या HMPV बाबत आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
HMPV Virus : चीनमध्ये सध्या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) धुमाकूळ घालत आहे. भारतातही याबाबत खबरदारी घेतली जात आहे. चीनमध्ये श्वसन रोगांच्या अलीकडील वाढीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसमुळे होणारे आजार देखील समाविष्ट आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.
शनिवारी (दि.४) आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर चीनमध्ये सर्व काही ठीक आहे आणि भारत श्वसन संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे एका निवेदनाद्वारे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोणत्याही संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहण्यासाठी अधिकारी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर आंतरराष्ट्रीय चॅनेलच्या अपडेट्सचे बारकाईने निरीक्षण करत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेला सक्रिय दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी वेळेवर अपडेट देण्याची विनंती देखील केली आहे.
याचबरोबर, HMPV सारखे व्हायरस भारतात आधीपासूनच प्रचलित आहेत आणि सध्या आरोग्य पायाभूत सुविधा कोणत्याही संभाव्य प्रकरणांना हाताळण्यास सक्षम आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, देशभरात श्वसन संक्रमण किंवा संबंधित रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली नाही, असे भारतातील निरीक्षण डेटावरून दिसून येते.
आरोग्य मंत्रालयाकडून लोकांना आवाहन
देशाच्या तत्परतेचा पुनरुच्चार करताना आरोग्य मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, भारताची मजबूत देखरेख ठेवणारी यंत्रणा आणि आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. तसेच, नागरिकांना शांत राहण्याचे आणि मानक आरोग्य खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन मंत्रालयाने केले. ज्यामध्ये स्वच्छता राखणे आणि लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे यांचा समावेश आहे.