हैदराबाद - तेलंगणा येथे स्थानिक निवडणुकांच्या निकालाने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने दमदार विजय मिळवला आहे. आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे निकाल काँग्रेसला सुखावणारे आहेत. त्याशिवाय या निकालात भारत राष्ट्र समिती आणि भाजपानेही आपली छाप पाडली आहे. परंतु संपूर्ण निकालात काँग्रेसने आपला दबदबा कायम राखला आहे.
या निवडणुकीत २९९५ वार्डांच्या निकालात तब्बल १५३७ वार्डात निर्णायक विजय मिळवत काँग्रेस नंबर वनचा पक्ष बनला आहे. काँग्रेसने भाजपासह एमआयएम आणि बीआरएस या सर्व पक्षांना धोबीपछाड दिली आहे. तेलंगणाच्या स्थानिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेस १५३७ वार्ड, बीआरएस ७८१ वार्ड, भाजपा ३३६ वार्ड, एमआयएमला ७० वार्ड, सीपीआय १३, इतर पक्ष ७३ वार्ड आणि अपक्षांनी १८३ वार्डात बाजी मारली आहे. हा निकाल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करणारा आहे.
KCR यांच्या बीआरएसला मोठा धक्का
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील बीआरएस पक्षाचा तेलंगणाच्या शहरी भागात वरचष्मा होता परंतु या निकालात त्यांना धक्का बसला आहे. बीआरएस पक्षाला ७८१ जागा मिळवण्यात यश आले परंतु त्यांना एकही नगरपालिका जागा जिंकता आली नाही, ज्यामुळे त्यांच्या शहरी समर्थकांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे असदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमने हैदराबादच्या बाहेर पडत इतर ठिकाणीही निवडणूक लढवली. त्यात भैंसा, बोधन आणि नारायणपेटसारख्या निवडक नगरपालिकांमध्ये त्यांनी काही प्रमाणात यश मिळवत सगळ्यांना चकीत केले. त्यांनी नगरपालिकेत ४७ आणि नगरपंचायतीत २२ हून अधिक वार्डात विजय मिळवला. जी त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
भाजपाने केला शिरकाव
निकालात काँग्रेसने बाजी मारली असली तरीही भाजपासाठीही हा निकाल दिलासा देणारा आहे. मागील महापालिका निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची कामगिरी यंदाच्या निकालात वरचढ राहिली. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली. भाजपाला सर्वात मोठं यश करीमनगर, निजामाबाद येथे मिळाले. करीमनगर पहिल्यांदाच भाजपाचा नगराध्यक्ष बनेल. याठिकाणचे लोकसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री संजय कुमार यांनी करीमनगर पालिका निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक यश मिळवून दिले. तेलंगणात भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत ७ टक्क्यांनी वाढ होऊन २० टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे भाजपाचा वाढता आलेख बीआरएससाठी डोकेदुखी ठरला आहे.
Web Summary : Congress secured a major victory in Telangana's local elections, surpassing BRS and BJP. While BRS faced setbacks, BJP significantly improved its performance, especially in Karimnagar and Nizamabad, increasing its vote share.
Web Summary : तेलंगाना के स्थानीय चुनावों में कांग्रेस ने बड़ी जीत हासिल की, बीआरएस और भाजपा को पछाड़ा। बीआरएस को झटका लगा, वहीं भाजपा ने करीमनगर और निजामाबाद में बेहतर प्रदर्शन किया और वोट शेयर बढ़ाया।