हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:55 IST2025-12-11T10:54:51+5:302025-12-11T10:55:13+5:30
Ethanol Factory Protest Rajasthan: राठीखेड़ा येथे आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट उभारला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पाणी आणि हवा दूषित होईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून याला विरोध करत आहेत.

हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी
राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यातील टिब्बी भागातील राठीखेड़ा गावाजवळ निर्माणाधीन असलेल्या एका इथेनॉल प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन बुधवारी अचानक हिंसक झाले. संतप्त जमावाने बॅरिकेड्स तोडून थेट प्रकल्पाच्या ठिकाणी धडक दिली. यावेळी झालेल्या प्रचंड गोंधळात आंदोलनकर्त्यांनी १६ हून अधिक वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलीस व्हॅन आणि जेसीबी मशीन्सचा समावेश होता.
राठीखेड़ा येथे आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट उभारला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पाणी आणि हवा दूषित होईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून याला विरोध करत आहेत. बुधवारच्या 'महापंचायती'नंतर शेतकऱ्यांचा एक मोठा जमाव कारखान्याच्या दिशेने निघाला. आंदोलक अनियंत्रित झाल्यावर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने कारखान्याची संरक्षक भिंत तोडून आत प्रवेश केला.
यानंतर जमावाने प्रकल्पाच्या आवारात आणि परिसरात उभ्या असलेल्या सुमारे १६ हून अधिक वाहनांना आग लावली आणि तोडफोड केली. यात पोलीस वाहनांचाही समावेश आहे.
लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर
हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला अश्रुधुराचे गोळे सोडावे लागले आणि सौम्य लाठीमार करावा लागला. या संघर्षात सुमारे १० ते १२ पोलीस कर्मचारी आणि आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले संगरियाचे काँग्रेस आमदार अभिमन्यू पूनियां यांच्यासह अनेक लोक जखमी झाले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने टिब्बी शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये इंटरनेट सेवा तात्काळ खंडित केली आहे. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून, अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. या हिंसक घटनेबद्दल राजकारण्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.