टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:57 IST2025-11-03T12:55:30+5:302025-11-03T12:57:22+5:30
उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर ६२मध्ये राहणाऱ्या एका इंजिनियर तरुणाला अशाच डेटिंग अॅपमधून तब्बल ६६ लाखांचा चुना लागला आहे.

AI Generated Image
सध्या सायबर क्राइमची प्रकरणे देशभरात वाढत आहेत. एकीकडे सायबर गुन्हेगार वृद्धांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून किंवा ओटीपी स्कॅम करून लुबाडत आहेत, तर दुसरीकडे तरुणाईला डेटिंग अॅप्सच्या जाळ्यात अडकवून चुना लावला जात आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर ६२मध्ये राहणाऱ्या एका इंजिनियर तरुणाला अशाच डेटिंग अॅपमधून तब्बल ६६ लाखांचा चुना लागला आहे. टिंडरवर जुळलेले मैत्रीचे धागे त्याला अक्षरश: कंगाल करून गेले आहेत. या डेटिंग अॅपवरून त्याची एका तरूणीशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात प्रेमाचे बंध निर्माण होऊ लागले आणि इथूनच त्याच्या खात्यातील पैश्यांना सुरुंग लागण्यास सुरुवात झाली.
नोएडा सेक्टर ६२मध्ये राहणाऱ्या इंजिनियर कपिलसोबत ही घटना घडली आहे. २०२३मध्ये टिंडर या डेटिंग अॅपचा वापर करत असताना त्याला शुभांगी नावाच्या एका महिलेकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानेही ती रिक्वेस्ट स्वीकारून तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. गप्पांच्या ओघात त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलू लागले. सुरुवातील डेटिंग अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या त्यांच्या गप्पा आता मोबाईल नंबर एकमेकांशी शेअर केल्यानंतर फोनवर सुरू झाल्या होत्या.
भेटही झाली नाही अन्...
दोघेही रोज एकमेकांशी गप्पा मारत होते. मात्र, अद्याप त्यांची एकही भेट झाली नव्हती. तरीही त्यांच्यातील प्रेम बहरत चालले होते. एकदिवशी शुभांगीने त्याला आपली नोकरी सुटल्याचे सांगितले. तसेच, आपण आजारी असल्याचेही ती म्हणाली. डॉक्टरचा बहाणा सांगून तिने कपिलकडे काही पैसे मागितले. कधी ५०० तर कधी १०००,१५०० असे पैसे कपिल ट्रान्सफर करतच होता. कित्येक दिवस हा पैसे मागण्याचा प्रकार सुरू होता. एकेदिवशी शुभांगीच्या कुटुंबातील व्यक्ती आणि वकील असल्याची बतावणी करून कपिलला धमकावण्याचा प्रकार सुरू झाला. आमची मुलगी आजारी पडली, त्याला तूच कारणीभूत आहेस, असे म्हणत कपिलकडून पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, कपिलने विरोध करताच त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
२ वर्षांत केले २९४ वेळा पैसे ट्रान्सफर
घाबरलेल्या कपिलने पैसे देणे सुरूच ठेवले. २ वर्ष हा प्रकार सुरू होता. हळूहळू पैशांची रक्कम वाढू लागली. आता मात्र कपिलच्या खत्यातील पैसे संपू लागले होते. त्यामुळे कपिलने पैसे देणे बंद केले. पैसे थांबताच पुन्हा धमक्या सुरू झाल्या. मात्र, यावेळी कपिलने पोलिसांत जाण्याचे धाडस दाखवले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन वर्षांच्या या काळात कपिलने तब्बल २९४ वेळा पैशांची देवाणघेवाण करत ६६.२२ लाख रुपये गमावले आहेत.