Engaged with China to resolve border row peacefully India on Trumps offer to mediate kkg | 'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर

'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर

नवी दिल्ली: एकीकडे कोरोना संकट दिवसागणिक आणखी गहिरं होत असताना दुसरीकडे लडाख सीमेवर चीननं कुरघोड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. हा तणाव निवळण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावरून भारतानं भूमिका स्पष्ट केली आहे. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी आम्ही चीनच्या संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असं उत्तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेला दिलं आहे.

भारत आणि चीनमधील सीमा वादाच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार आहोत, असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलं होतं. 'भारत आणि चीनची तयारी असल्यास अमेरिकेची मध्यस्थी करण्याची तयारी आहे,' असं ट्रम्प म्हणाले होते. याआधी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असतानाही ट्रम्प यांनी समेट घडवण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुद्दा आहे. हा द्विपक्षीय प्रश्न असल्यानं तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचं उत्तर भारतानं दिलं होतं. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नेपाळ आणि चीन यांच्यासोबत सध्या सुरू असलेल्या सीमा वादाबद्दल सरकारची भूमिका मांडली. 'भारत आणि नेपाळचे संबंध अतिशय जुने आहेत. कोरोना संकटाच्या काळात आपण कोणत्याही परवान्याशिवाय व्यापार करत आहोत. सध्या नेपाळसोबत निर्माण झालेल्या वादावर आमचं लक्ष आहे. भारत संवेदनशीलपणे आपल्या शेजाऱ्यांसोबतचे संबंध कायम ठेवेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत निर्माण झालेल्या सीमावादावरही श्रीवास्तव यांनी भाष्य केलं. 'आपले जवान अतिशय जबाबदारीनं सीमावर्ती भागातील परिस्थिती हाताळत आहेत. दोन्ही देशांनी मिळून तयार केलेल्या प्रोटोकॉलचं सैन्याकडून पालन केलं जात आहे. नेतृत्त्वाकडून देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी जवान करत आहेत. देशाचं अखंडत्व आणि सार्वभौमत्व राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,' असं श्रीवास्तव म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Engaged with China to resolve border row peacefully India on Trumps offer to mediate kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.