'नितीश कुमारांचा सर्वनाश निश्चित, त्यांना मुख्यमंत्री बनवून चुकी केली'- प्रशांत किशोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:36 IST2022-12-16T19:36:45+5:302022-12-16T19:36:59+5:30
बिहारमध्ये विषारी दारूमुळे होत असलेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पीकेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

'नितीश कुमारांचा सर्वनाश निश्चित, त्यांना मुख्यमंत्री बनवून चुकी केली'- प्रशांत किशोर
पाटणा: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांची सातत्याने मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्यावर टीकी सुरू आहे. बिहारमध्ये विषारी दारुमुळे अनेकांचा मृत्यू झाला, यावरुन पीकेने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. नितीश कुमार यांचा सर्वनाश निश्चित, असल्याचे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे.
आज म्हणजेच शुक्रवारपासून प्रशांत किशोर शिवहरमधून आपल्या पदयात्रेला सुरुवात करत आहेत. यादरम्यान त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'नितीश कुमार यांच्यासारखा असंवेदनशील माणूस मी कधीच पाहिला नाही. 2014-15 मध्ये त्यांना मुख्यमंत्री होण्यास मदत केली, ती माझी सर्वात मोठी चूक होती. या अहंकारी व्यक्तीचा सर्वनाश निश्चित आहे,' अशी टीका पीकेंनी केली.
ते पुढे म्हणाले की, 'कोरोना महामारीच्या काळात बिहारमधील लाखो लोक उपाशीपोटी पायी आपल्या घरी परतत होते, त्यावेळीही नितीश कुमार त्यांच्या घरात आरामात बसले होते. छपरात दारूमुळे झालेल्या मृत्यूबद्दल नितीश कुमार यांनी शोकही व्यक्त केला नाही,' असं पीके म्हणाले. तसेच, जेडीयू आणि आरजेडीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले की, मुख्यमंत्री आरजेडीसोबत कधीच आरामात राहू शकत नाहीत. मुख्यमंत्रीपदावर राहणे ही मजबुरी आहे, असे म्हणता येईल', अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, 'बिहारमध्ये विविध ठिकाणी दारूची होम डिलिव्हरी केली जात असून बिहारसारख्या गरीब राज्याला वर्षभरात दारूबंदीमुळे सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. बिहारमध्ये दारूबंदी पूर्णपणे फसली आहे. दारूबंदीमुळे होणारे नुकसान सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. डिझेलवर 9 रुपये आणि पेट्रोलवर 13 रुपये प्रतिलिटर कर वसूल केला जात आहे,' अशी टीका पीकेंनी केली.