जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय सैन्याकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:05 IST2023-10-04T18:04:54+5:302023-10-04T18:05:14+5:30
दक्षिण काश्मीरच्या कुज्जर-कुलगाममध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय सैन्याकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा
Encounter in Kulgam: दक्षिण काश्मीरच्या कुज्जर-कुलगाममध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेनंतर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैणात करण्यात आला आहे. दरम्यान, राजौरी जिल्ह्यातील तट्टापाणी भागात सोमवारी सायंकाळी सुरू झालेली दहशतवादविरोधी कारवाई आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुलगाम जिल्ह्यातील कुज्जर भागात दहशतवाद्यांचा एक ग्रुप दिसला. स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी लष्कराच्या जवानांसह दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कुज्जरमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी वेढा तोडून पळून जाण्यासाठी जवानांवर गोळीबार केला.
सर्व बाजूंनी जोरदार गोळीबार
प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी त्यांना चारही बाजूंनी घेरण्यास सुरुवात केली. यावेळी सैन्याच्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेले. परिसरात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता आहे, त्यामुळे परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.