अकरा महीन्यांपूर्वी 16 वर्षीय मुलाचा एनकाउंटर, अद्याप कुटुंबाला मिळाला नाही मृतदेह; काय आहे प्रकरण...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:12 IST2021-11-23T09:11:48+5:302021-11-23T09:12:18+5:30
11 महिन्यांपूर्वी अतहर मुश्ताक नावाच्या 16 वर्षीय मुलाचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला होता.

अकरा महीन्यांपूर्वी 16 वर्षीय मुलाचा एनकाउंटर, अद्याप कुटुंबाला मिळाला नाही मृतदेह; काय आहे प्रकरण...?
श्रीनगर: गेल्या 11 महिन्यांपासून एक पिता आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहे. मात्र सतत प्रयत्न करुनही पदरी निराशाच पडतीय. 16 वर्षीय अतहर मुश्ताक 29 डिसेंबर 2020 नंतर घरी परतला नाही. वडील मुश्ताक अहमद वाणी यांना नंतर कळले की, मुलगा पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे. तेव्हापासून आजतागायत मुश्ताक वाणी हे आपल्या मुलाच्या मृतदेहाची मागणी करत आहेत. चकमकीची माहिती मिळाल्यानंतर अतहरच्या वडिलांनी 11 महिन्यांपूर्वी आपल्या मुलासाठी कबर खोदली होती, परंतु ते अजूनही मुलाच्या मृतदेहाची वाट पाहत आहेत.
चकमकीत मृत्यू
मुश्ताक अहमद वाणी सांगतात की, त्यांचा मुलगा अतहर मुश्ताक हा 11वीचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा सुरू होती, 29 डिसेंबरपर्यंत त्याने चार पेपर दिले होते. परीक्षेदरम्यान त्याला दुपारी दोन वाजता उचलण्यात आले. त्यानंतर काय झाले हे आम्हाला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह पोलिस नियंत्रण कक्षात पडून होता. त्याचा चकमकीत मृत्यू झाला, एवढंच आम्हाला सांगण्यात आलं.
पोलिसांनी परस्पर पुरला मृतदेह
अतहर त्याच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जात असताना श्रीनगरजवळील लवेपोरा येथे झालेल्या चकमकीत इतर दोन तरुणांसह मारला गेला. बोर्डाच्या निकालानुसार अतहर त्याच्या शेवटच्या पेपरला गैरहजर होता. कुटुंबाचे म्हणणे आहे की, घर सोडल्यानंतर तीन तासांनंतर अतहरला चकमकीत मारण्यात आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह सोनमर्ग येथे पुरला होता. पण, आजपर्यंत अतहरच्या वडिलांना त्याचा मृतदेह दिसला नाही.
दहशतवादी असल्याचा दावा
परीक्षेच्या शेवटच्या पेपरआधी त्याची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. ते सांगतात की, मी त्याच्या मृतदेहाची मागणी करून थकलो आहे, पण कोणी ऐकत नाही. ही चकमक झाली तेव्हा त्याबाबत पोलिसांची वेगवेगळी वक्तव्ये होती. यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की, चकमकीत मारले गेलेले तीन लोक पोलिस रेकॉर्डमध्ये दहशतवादी म्हणून सूचीबद्ध नाहीत. मात्र दोनच दिवसांनंतर पोलिसांनी हे तिघे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचा दावा केला.
अशाप्रकारची अनेक प्रकरणे आहेत
पोलिसांनी सुनियोजित पद्धतीने चकमकीत मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. ठार झालेल्या तिघांपैकी एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. या पद्धतीची आणखी प्रकरणे समोर आली असून, त्यातही मृतांच्या कुटुंबीयांना मृतदेह मिळाले नाहीत. आजही अनेक कुटुंबे मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत.