बाईक चोरीनंतर सोशल मीडियावर लिहिली इमोशनल पोस्ट; वाचून चोराने गाडी परत केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 18:55 IST2023-12-14T18:54:31+5:302023-12-14T18:55:05+5:30
या अनोख्या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

बाईक चोरीनंतर सोशल मीडियावर लिहिली इमोशनल पोस्ट; वाचून चोराने गाडी परत केली
सूरत: बाईक चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील, पण गुजरातच्या सूरतमधून बाईक चोरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपली बाईक चोरीला गेल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली, यानंतर चोरट्याने ही पोस्ट वाचून त्या व्यक्तीला त्याची दुचाकी परत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, परेश भाई पटेल, असे या बाईकच्या मालकाचे नाव आहे. त्यांनी 9 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये बाईक ठेवली होती. संध्याकाळी बाईक चोरीला गेल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना चोरीची घटना दिसली. परेश भाई पटेल यांनी हे फुटेज आपल्या मोबाईलमध्ये घेतले आणि फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली. दुचाकी चोरीची तक्रारही पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
बाईक चोरीला गेल्यानंतर परेश पटेल यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'मिस्टर जेंटलमन चोर, तुम्ही माझी बाईक चोरुन नेली, पण चावी आणि आरसी बुक नसल्यामुळे तुम्हाला बाईक चालवताना अडचण येईल. त्यामुळे बाईखची चावी आणि आरसी बुक पार्किंगमध्ये जनरेटरवर ठेवले आहे, तेदेखील घेऊन जा. माझी काळजी करू नका, मी सायकलवरही फिरू शकतो.' बाईक मालकाची सोशल मीडियावरची पोस्ट चोरट्यापर्यंत पोहोचल्यानंतर 2 दिवसात चोराने दुचाकी पुन्हा त्याच ठिकाणी उभी केली. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे.