७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 06:00 IST2025-07-20T06:00:21+5:302025-07-20T06:00:42+5:30
भाजपने ३६ पैकी २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या आहेत; परंतु अद्याप त्यांच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केलेली नाही.

७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपने ३६ पैकी २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या आहेत; परंतु अद्याप त्यांच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केलेली नाही. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या सात राज्यांमध्ये नियुक्त्या पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवडीला विलंब होत आहे.
पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी आधीच कोरम पूर्ण केला आहे; परंतु वरिष्ठ नेतृत्व सर्व राज्यांमध्ये नियुक्त्या आधी पूर्ण करू इच्छित आहे. सूत्रांनी सांगितले की, सर्वसहमतीचा उमेदवार निश्चित झालेला आहे; पण, विलंबाचे कारण स्पष्ट झालेले नाही.
उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणा या चार राज्यांतील नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यातील प्रतिस्पर्धी गटातील अंतर्गत सत्तासंघर्षामुळे विलंब झाला आहे.
कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्याबाबत पक्षात नाराजी आहे. गुजरातमध्ये केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांचा कार्यकाळ संपत आला आहे. तथापि, राज्याची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. हरयाणामध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बडोली यांना व्यापक पाठिंबा नाही.
नेमकी अडचण काय?
झारखंडमध्ये आदिवासी नेतृत्व पुढे करायचे की गैरआदिवासी मतदारांना एकत्र ठेवायचे अशा द्विधा मन:स्थितीत पक्ष विभागलेला आहे. दिल्लीमध्ये अंतर्गत संघर्ष टाळला जात आहे. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारामुळे राजकीय हालचाल जवळपास थांबलेली आहे.