पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; मतदान ९ ते २९ एप्रिलदरम्यान, निकाल ४ मे रोजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 06:31 IST2026-03-16T06:28:45+5:302026-03-16T06:31:26+5:30
पश्चिम बंगालमध्ये २ टप्प्यात, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात मतदान; एकूण ८२४ जागांसाठी १७.४ कोटी नागरिक बजावणार हक्क; दक्षिणेत मिळेल का 'कमळ'ला एंट्री?

पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; मतदान ९ ते २९ एप्रिलदरम्यान, निकाल ४ मे रोजी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने रविवारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यनिहाय ९ ते २९ एप्रिलदरम्यान मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण होईल. या राज्यांतील एकूण ८२४ जागांसाठी ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित राज्यांत आचारसंहिता लागू झाली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीचा हा कार्यक्रम पत्रकार परिषदेत जाहीर केला. या वेळी निवडणूक आयुक्त सुखबिरसिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते.
निर्दोष मतदारयादी हाच आपल्या लोकशाहीचा आधार आहे. कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहायला नको, किंवा अपात्र मतदाराचा यादीत समावेश व्हायला नको, असे ते म्हणाले. मतदान केंद्रांवर तैनात अधिकारी दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी वेबसाईटवर अपलोड करतील, असे ते पुढे म्हणाले.
या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे काय?
तामिळनाडू : महिला सुरक्षेचा प्रश्न, राज्यावर वाढलेला कर्जबोजा, निवडणूक आश्वासने पूर्ण न झाल्याचा आरोप, मोफत योजनांची स्पर्धा हे मुख्य मुद्दे आहेत.
पश्चिम बंगाल : ‘बंगाली अस्मिता’, मतुआ समाजाचे राजकारण, एसआयआर, सत्ताविरोधी नाराजी, तसेच घुसखोरी-भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत.
आसाम : घुसखोरीचा प्रश्न, अतिक्रमण हटाव मोहीम, विकास प्रकल्प, बालविवाहाविरोधातील कारवाई.
केरळ : शबरीमाला प्रवेशाचा संवेदनशील प्रश्न, सीएए, एनआरसी, नवे कामगार कायदे हे प्रमुख मुद्दे आहेत.
पुद्दुचेरी : राज्याचा दर्जा, भ्रष्टाचार, आघाड्या व अंतर्गत राजकारण याभोवती सध्या येथे राजकारण फिरत आहे.
कुठे, कधी, किती टप्प्यात होणार विधानसभा निवडणुका?
राज्य/केंद्रशासित प्रदेश जागा टप्पे मतदान निकाल सध्या सत्ता
प. बंगाल २९४ दोन टप्पे २३, २९ एप्रिल ४ मे तृणमुल
तामिळनाडू २३४ एक टप्पा २३ एप्रिल ४ मे डीएमके
केरळ १४० एक टप्पा ९ एप्रिल ४ मे सीपीआय(एम)
आसाम १२६ एक टप्पा ९ एप्रिल ४ मे भाजप
पुदुचेरी ३० एक टप्पा ९ एप्रिल ४ मे एनडीए
ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, पी. विजयन यांचे गड भेदण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान; आसाममध्ये काँग्रेसची तब्बल १० पक्षांशी युती
पश्चिम बंगाल
१४ वर्षांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपचे मुख्य आव्हान आहे. जर तृणमूल काँग्रेस विजयी झाली तर ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा इतिहास रचतील.
तामिळनाडू
१९६७ पासून तामिळनाडूचे राजकारण अण्णा द्रमुक आणि द्रमुकभोवती फिरत आहे. सध्या एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सत्तेत आले आहे. येथे भाजपला सतत अपयश.
केरळ
सत्ता बदलण्याची परंपरा; परंतु २०२१ मध्ये डाव्या आघाडीने (एलडीएफ) ही परंपरा मोडली. काँग्रेसने येथे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपला एकही जागा जिंकण्यात अपयश.
आसाम
भाजप गेल्या १० वर्षांपासून राज्यात सत्तेत आहे. पक्षाने १२६ पैकी १०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपला तोंड देण्यासाठी काँग्रेसने १० पक्षांशी युती केली आहे.
पुद्दुचेरी
२०२१ मध्ये काँग्रेस सरकार पडले अन् एआयएनआरसी-भाजप युती पुन्हा सत्तेत आली. एन. रंगास्वामी पुन्हा मुख्यमंत्री झाले. भाजपला सत्तेत थेट वाटा मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.
