रस्त्यावरील भाजी विक्रेत्याच्या मुलाला भाजपाची उमेदवारी; 'या' जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 10:59 IST2019-09-30T10:03:15+5:302019-09-30T10:59:48+5:30
हमीरपूर पोटनिवडणुकीनंतर भाजपानं इतर 10 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

रस्त्यावरील भाजी विक्रेत्याच्या मुलाला भाजपाची उमेदवारी; 'या' जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात
लखनऊः हमीरपूर पोटनिवडणुकीनंतर भाजपानं इतर 10 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यात सर्वात जास्त चर्चा मऊमधल्या घोसी या जागेची होत आहे. कारण भाजपानं या जागेवरून रस्त्यावरील भाजी विक्रेत्याच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. घोसी जागेवरून भाजपानं विजय राजभर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. बिहारचे राज्यपाल असलेल्या फागू चौहान यांच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची आशा होती, परंतु त्याचा पत्ता कट करून विजय राजभर यांना संधी देण्यात आली.
भाजपाची तिकीट मिळाल्यानंतर विजय राजभर म्हणाले, संघटनेनं मला मोठी जबाबदारी दिली आहे. माझे वडील रस्त्यावर भाजी विकतात. मी या परीक्षेत पास होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. फागू चौहान यांना बिहार राज्याचे राज्यपाल बनवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं स्वप्न साकार करण्यासाठीच भाजी विक्रेत्याच्या मुलाला उमेदवारी देण्यात आल्याचं भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं स्वप्न होतं, विजय राजभर मऊमध्ये पार्टीचे नगर अध्यक्ष आहेत. ते नेहमीच राजकारणात सक्रिय असतात. ते नगरपालिका निवडणुकीतही निवडून आले होते. भाजपाकडून मुलाला विधानसभेचं तिकीट मिळाल्यानं वडिलांच्याही आनंदाला पारावार उरलेला नाही. विजय राजभर यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही व्यक्त केले आहेत. तसेच मुलाला विजयासाठी आशीर्वादही दिला आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 10 उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच, केरळ - 5, आसाम – 4, पंजाब -2, हिमाचल प्रदेश - 2, सिक्कीम -2, बिहार - 1, छत्तीसगड -1, मध्यप्रदेश -1, मेघालय -1, ओदिशा -1, राजस्थान -1, तेलंगणा -1 या भाजपाच्या पहिल्या यादीत समावेश आहे.