लोकसभा निवडणूक वेळेवरच होणार, निवडणूक आयोगाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 17:28 IST2019-03-01T17:19:55+5:302019-03-01T17:28:34+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकसभा निवडणूक वेळेवरच होणार, निवडणूक आयोगाची घोषणा
लखनौ - भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती दिली आहे.
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यावेळी इव्हीएमवर घेण्यात येणाऱ्या शंकांबाबतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ''आम्ही जाणते अजाणतेपणी इव्हीएमचा फुटबॉल बनवला आहे. निकाल मनासारखे लागले तर ईव्हीएम चांगल्या आणि निकाल विरोधात गेले तर इव्हीएम खराब असे आरोप केले जातात.'' असे ते म्हणाले.