‘तथ्य असल्यास राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:50 IST2025-08-10T11:50:56+5:302025-08-10T11:50:56+5:30
महाराष्ट्र, कर्नाटक व हरयाणा या राज्यांत मतदानप्रक्रियेत घोळ झाल्याचा दावा गुरुवारी राहुल गांधी यांनी केला.

‘तथ्य असल्यास राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी’
नवी दिल्ली : निवडणुकी दरम्यान मतचोरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या आरोपात तथ्य असले तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी किंवा खोटे आरोप केल्याबद्दल देशाच्या जनतेची माफी मागावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले. मतदानप्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करत गांधींनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. त्यामुळे शनिवारी पुन्हा निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक व हरयाणा या राज्यांत मतदानप्रक्रियेत घोळ झाल्याचा दावा गुरुवारी राहुल गांधी यांनी केला. निवडूक आयोगावर आरोप करताना मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झाला, याचे पुरावे म्हणून मतदार याद्यांतील माहिती त्यांनी सादरीकरणाद्वारे दिली होती. त्यामुळे मतदार याद्यांमधून नावे वगळलेल्या मतदारांची तसेच चुकीच्या पद्धतीने नावे समावेश केलेल्या लोकांची माहिती देण्याची मागणी या तीन राज्यांमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गांधींना केली आहे. राहुल गांधींनी मात्र प्रतिज्ञापत्र देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संसद सदस्य म्हणून आपण आधीच संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतल्याचा दावा गांधींनी केला आहे.
...तर राहुल गांधींनी राजीनामा द्यावा : भाजप
राहुल गांधी यांना निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा. राहुल गांधींसोबत काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा सल्ला देत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली. तुम्ही माध्यमांसमोर निराधार आरोप करता. जेव्हा एखादी संवैधानिक संस्था पुरावे व स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र मागते, तेव्हा तुम्ही ते देण्यास नकार देता, असे म्हणत भाटियांनी राहुल गांधींना लक्ष्य केली.