Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:50 IST2025-10-06T16:50:34+5:302025-10-06T16:50:52+5:30
Bihar Assembly Election 2025 Dates: बिहार विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची आज घोषणा करण्यात आली. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
Bihar Election 2025 Date Annouced: बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून, १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १० ऑक्टोबरला अधिसूचना काढली जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १३ ऑक्टोबरला अधिसूचना जारी होणार आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान कधी?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूक - महत्त्वाच्या तारखा
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख - पहिल्या टप्प्यासाठी १७ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर.
अर्ज पडताळणीची तारीख - पहिल्या टप्प्यासाठी १८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यासाठी २१ ऑक्टोबर.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - पहिल्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यासाठी २३ ऑक्टोबर.
मतदानाची तारीख - पहिला टप्पा ६ नोव्हेंबर, दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर.
मतमोजणी - १४ नोव्हेंबर.
बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान आहे. तुम्ही नकाशा बघितला तर तुमच्या लक्षात जो भाग पिवळा दाखवला आहे, तेथील मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर गुलाबी रंगात दिसणाऱ्या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण, जर यात काही नावाच्या वा इतर त्रुटी असतील, तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या १० दिवस आधीपर्यंत ते दुरुस्त करता येईल. यावेळी बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर विशेष लक्ष दिलं जाईल.