शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:16 IST2025-08-14T13:15:54+5:302025-08-14T13:16:36+5:30
दीर्घ काळ न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या खटल्यावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्या अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.

शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
नवी दिल्ली - मागील ३ वर्षापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे या खटल्याची अंतिम सुनावणी ८ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर १९ ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे. त्यानंतर शिवसेना कुणाची या वादाचा फैसला ऑक्टोबर महिन्यात येणार आहे. संगणक प्रणालीत ८ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट या वादावर निर्णय देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडे मागितलेल्या सल्ल्याला उत्तर देण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात न्यायाधीश सूर्यकांत यांचाही समावेश आहे. न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. त्यामुळे शिवसेना खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे. त्यात दिवाळीच्या नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असं बोलले जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट देणार आहे.
मागील सुनावणीत काय घडलं?
दीर्घ काळ न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या खटल्यावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्या अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर १४ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असं सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असं स्पष्ट केले होते. मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. या प्रकरणाला २ वर्ष झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे संकेतच सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत दिले होते.
उद्धव ठाकरेंचं सरन्यायाधीशांना साकडे
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि नाव यासंदर्भातील याचिकेवरून थेट देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना साकडे घातले. हा खटला न्यायालयात दाखल झाल्यापासून आपण चौथे सरन्यायाधीश आहात. लोकशाहीच्या तोंडात न्यायाचे पाणी जर नाही घातले तर देशाची लोकशाही मरेल. त्यामुळे आपण त्यात लक्ष घाला ही मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो आहे. आपल्या न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडते आहे. तीन ते चार वर्षे झाली ती कधी प्राण सोडेल माहीत नाही असं ठाकरेंनी म्हटलं.