सोनं शोधण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये आठ जणांना उतरवले, चौघांचा गुदमरून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:58 IST2025-05-27T12:57:58+5:302025-05-27T12:58:30+5:30
Jaipur Accident: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सीतारपुरा ज्वेलरी मार्केटमधील अचल जेम्स ज्वेलरी फॅक्टरीमधील सेप्टिक टँकच्या साफसफाईदरम्यान, चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला.

सोनं शोधण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये आठ जणांना उतरवले, चौघांचा गुदमरून मृत्यू
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सीतारपुरा ज्वेलरी मार्केटमधील अचल जेम्स ज्वेलरी फॅक्टरीमधील सेप्टिक टँकच्या साफसफाईदरम्यान, चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. या दुर्घटनेत दोन मजूर बचावले आहेत. ज्वेलरी फॅक्टरीमध्ये दागिने तयार करत असताना सोन्याचे लहान तुकडे आणि कण बाहेर पडत असतात. तसेच हे कण पण्यासोबत सेप्टिक टँकमध्ये गोळा होता. त्यामुळे दर दोन महिन्यांनी टँकची सफाई करून त्यातील केमिकलयुक्त पाणी बाहेर काढून त्यामधून हे सोन्याचे कण गोळा केले जातात.
जेम्स ज्वेलरी फॅक्टरीमधील सेप्टिक टँकची साफसफाई करण्यासाठी मजुरांना टाकीमध्ये उतरवण्यात आले होते. मात्र टँकमध्ये साठलेल्या विषारी वायुच्या संपर्कात आल्याने हे मजुर बेशुद्ध पडले. आतमधून काहीच हालचाल होत नसल्याने काय झालं हे पाहण्यासाठी आणखी दोन मजूर आत उरतले. ते सुद्धा या गॅसच्या संपर्कात आले. या घटनेची माहिती मिळताच पोसील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी या मजुरांना बाहेर काढून महात्मा गांधी रुग्णालयात नेले.
रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी चार मजुरांना मृत घोषित केले. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या टँकमध्ये विषारी वायू आणि कार्बन डाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे सांगण्यात येत आहे. तसेच या कामगारांना सुरक्षेसाठीची कुठलीही उपकरणे न पुरवता टँकमध्ये उतरवण्यात आले होते, असेही समोर आले आहे.