उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 05:38 IST2025-07-25T05:37:43+5:302025-07-25T05:38:07+5:30
जगदीप धनखड लवकरच नवीन सरकारी बंगल्यात, भाजपची उमेदवारासाठी शोधाशोध सुरू

उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्यानंतर त्यासाठी उमेदवार कोण याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार पुढील आठवड्यात वेगाने हालचाली करण्याची शक्यता आहे. याप्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा पूर्ण झाल्यानंतर आणि काही वादग्रस्त मुद्द्यांवरील धुरळा खाली बसल्यानंतर अधिक सुस्पष्टता येणार आहे.
भाजप आपल्याच पक्षातील व्यक्तीला उपराष्ट्रपती पदावर विराजमान करण्यास प्राधान्य देईल. त्यासाठी तो सहमती निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. भाजपला स्वबळावर बहुमत मिळविता न आल्याने जनता दल (यू) व तेलुगू देसम पक्ष या दोन घटक पक्षांनाही रुचेल, असा उमेदवार देण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे.
घटक पक्षांतील नावेही चर्चेत
सर्व घटकांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता बाळगणारा उमेदवार उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरविण्यासाठी भाजपने आता आपल्या पक्षात शोधाशोध सुरू केली आहे. तसेच घटक पक्षांच्या काही नेत्यांचीही नावे चर्चेत आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. येत्या काळात याचा निर्णय होईल.
राजीनाम्याची टाइमलाइन; ‘त्या’ दिवशी काय घडले?
सूत्रांच्या माहितीनुसार, धनखड यांनी उपराष्ट्रपती निवासस्थानातून सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे. नगरविकास मंत्रालय त्यांना सरकारी बंगला देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांनी प्रकृतीच्या कारणांपायी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला असला तरी या निर्णयामागे आणखी काही कारण नक्कीच असणार अशी चर्चा सुरू आहे.
सोमवारी सकाळी ११:०० वाजता : धनखड राज्यसभेचे सभापतीपद भूषवतात, शपथविधी, प्रश्नोत्तर तास पार पडतो.
दुपारी १:०० वाजता : ६३ विरोधी खासदार न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करतात.
दुपारी २:३० वाजता : पंतप्रधान मोदी, नड्डा व रिजिजू महाभियोग प्रस्तावाबाबत बैठक घेतात.
३:५३ वाजता : उपराष्ट्रपती कार्यालयाकडून २३ जुलै रोजीच्या जयपूर भेटीबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी होते.
सायं. ४:०५ वाजता : धनखड राज्यसभेत वर्मा यांच्यावरील प्रस्ताव अधिकृतपणे स्वीकारतात.
सायं. ४:१० वाजता : न्यायमूर्ती शेखर यादव यांच्यावरील दुसऱ्या प्रस्तावात खोट्या सह्यांची शंका आल्याने तो थांबवतात.
सायं. ५:०० वाजता : धनखड यांनी बोलाविलेल्या बिजनेस ॲडव्हायजरी कमेटीच्या बैठकीला सत्तापक्ष नेते उपस्थित राहिले नाही.
सायं. ६:३० वाजता : धनखड संसद भवनातून निघतात.
रात्री ९:२५ वाजता : आरोग्याचे कारण देत राष्ट्रपती मुर्मूंकडे राजीनामा सादर करतात.