डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:49 IST2025-12-19T15:48:03+5:302025-12-19T15:49:23+5:30
ईडीने 13 ठिकाणी छापे टाकून या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज, रोकड आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत.

डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
डंकी रुटद्वारे चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराच्या रॅकेटविरोधात प्रवर्तन निदेशालय (ED) ने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी जालंधरस्थित ईडी पथकाने पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील एकूण 13 ठिकाणी छापे टाकून या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज, रोकड आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. या कारवाईमुळे डंकी रुटच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश झाल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
छाप्यांतून महत्त्वाचे पुरावे जप्त
छापेमारीदरम्यान ईडीच्या हाती डंकी रुटशी संबंधित अनेक महत्त्वाचे कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे लागले आहेत. दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजंटच्या ठिकाणाहून ₹4.62 कोटी रोख रक्कम, 313 किलो चांदी आणि 6 किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत.
ईडीच्या अंदाजानुसार जप्त केलेल्या रोख रकमेची आणि मौल्यवान धातूंची एकूण किंमत सुमारे ₹19.13 कोटी इतकी आहे. यासोबतच डंकी व्यवसायात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींशी झालेल्या चॅट्स, आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड आणि आक्षेपार्ह कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
हरियाणातही मोठे खुलासे
हरियाणातील डंकी रुटच्या एका प्रमुख सूत्रधाराच्या ठिकाणाहून या बेकायदेशीर धंद्याशी संबंधित अनेक रेकॉर्ड आणि दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, हा आरोपी लोकांना मेक्सिको मार्गे अमेरिकेत पाठवण्याच्या बदल्यात पैसे मिळतील याची खात्री म्हणून त्यांच्या जमीन-जायदादीचे कागद स्वतःकडे ठेवत होता.
#BREAKING: The Enforcement Directorate (ED), Jalandhar Zonal Office, conducted raids on December 18, 2025, at 13 locations across Punjab, Haryana, and Delhi in connection with a “donkey route” illegal immigration case. The searches led to the seizure of ₹4.62 crore in cash, 313… pic.twitter.com/6RuacaJkMa
— IANS (@ians_india) December 19, 2025
मोबाइल फोन व डिजिटल पुरावेही जप्त
छापेमारीदरम्यान इतर आरोपींच्या ठिकाणांहून मोबाइल फोन, डिजिटल डिव्हाइसेस आणि आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले असून, त्याद्वारे संपूर्ण नेटवर्कची साखळी उलगडण्यास मदत होत आहे.
सर्व आरोपींवर कारवाईचे संकेत
ईडीने सांगितले की, जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे डंकी रुटच्या संपूर्ण नेटवर्कमधील सहभागी व्यक्तींवर पुढील कठोर कारवाई केली जाईल. या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोधही सुरू असून, तपास अधिक तीव्र केला जाणार आहे.