Mahua Moitra: टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 22:03 IST2024-03-04T21:54:55+5:302024-03-04T22:03:50+5:30
Mahua Moitra : 11 मार्च रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Mahua Moitra: टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
ED summonsTMC leader Mahua Moitra for questioning in FEMA case (Marathi News) नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. पैसे घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात (कॅश फॉर क्वेरी) आधीच त्यांची खासदारकी गेली आहे. त्यातच आता महुआ मोईत्रा या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. ईडीने महुआ मोईत्रा यांना फेमा उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स बजावले आहे. त्यांना 11 मार्च रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली.
याआधी ईडीने महुआ मोईत्रा यांना समन्स पाठवून 19 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, महुआ मोईत्रा यांनी तपासात सहभागी होण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ मागितला होता. गेल्या महिन्यात महुआ मोईत्रा यांनी ईडीला पत्र पाठवून हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती. आता महुआ मोईत्रा यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून 11 मार्च रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अक्ट (फेमा) अंतर्गत दाखल प्रकरणात ईडीला महुआ मोईत्रा यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवायचा आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात इतर काही परदेशी निधी हस्तांतरित करण्याव्यतिरिक्त एनआरई खात्यांशी संबंधित व्यवहार ईडीकडून तपासला जाणार आहे. तसेच, सीबीआयही या प्रकरणाचा तपास करत असून लोकपालही महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करत आहेत. सीबीआय प्रकरणाच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पैसे घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात आधीच त्यांची खासदारकी गेली आहे. महुआ मोईत्रा यांची खासदारकी लोकसभेच्या एथिक्स कमिटीच्या शिफारशीनुसार रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सदस्यांसाठीच्या पोर्टलचे पासवर्ड व युझर आयडी इतरांना दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.