The ED sought details of the Vikas Dubey family's assets; Will file a money laundering case | Vikas Dubey Encounter: दुबे कुटुंबाच्या संपत्तीचा तपशील ईडीने मागवला; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करणार

Vikas Dubey Encounter: दुबे कुटुंबाच्या संपत्तीचा तपशील ईडीने मागवला; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करणार

नवी दिल्ली/लखनौ : पोलीस चकमकीत ठार करण्यात आलेला गँगस्टर विकास दुबे, त्याचे कुटुंबीय व साथीदारांच्या संपत्तीचा तपशील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मागवला आहे. या सर्वांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांना ईडीचे पत्र प्राप्त झाले असून, त्यात संपत्तीचा तपशील लवकरात लवकर देण्यास सांगितले आहे. सोमवारी, ६ जुलै रोजी हे पत्र लिहिण्यात आलेले आहे. यात विकास दुबे, त्याचे कुटुंब व जवळच्या साथीदारांची यादीही मागितली आहे.
विकासच्या माध्यमातून विविध ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांचाही ईडी शोध घेणार आहे. त्याचबरोबर या सर्वांनी अनेकांची फसवणूक करून, धमकावून कमावलेल्या तसेच अवैध प्रकारांतून कमावलेल्या संपत्तीचीही चौकशी करण्यात येणार आहे. विकास दुबे व त्याच्या कुटुंबियांच्या नावावर अमाप संपत्ती असल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश व परिसरात दुबे व त्याच्या कुटुंबाच्या नावावर २५ हून अधिक नामी, बेनामी संपत्ती, बँक गुंतवणूक, ठेवींवर केंद्रीय तपास यंत्रणेची नजर आहे. याबाबतची काही माहिती दिली गेली आहे व काही माहिती देणे बाकी आहे, असेही सूत्रांनी सांगितले. दुबे व त्याच्याशी संबंधित लोकांच्या विदेशी संपत्तीचाही तपशील मागविण्यात आला आहे. चकमकीत त्याला ठार करण्यात आले असले तरी मनी लाँड्रिंगचा गुन्हा व इतर गुन्हेगारी कारवायांमधून कमावलेल्या संपत्तीबाबत मुख्य गुन्हेगाराच्या साथीदारांची चौकशी करण्यात येणार आहे. या कायद्याच्या कलम ७२ अंतर्गत मृत्यू किंवा दिवाळखोरीनंतरही गुन्हा चालू ठेवण्याची तरतूद आहे. विकास दुबेविरुद्ध सुमारे ६० गुन्हे दाखल आहेत. तीन जुलैच्या रात्री दुबे टोळीच्या हल्ल्यात आठ पोलिसांच्या मृत्यूच्या गुन्ह्याचाही यात समावेश आहे.

एन्काऊंटरची एसआयटीमार्फत चौकशी करा : सुप्रीम कोर्टात याचिका
विकास दुबे व त्याच्या दोन साथीदारांच्या एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. या एन्काऊंटरची एसआयटी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी एका स्वयंसेवी संस्थेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या अनुषंगाने गुन्हेगार व राजकीय नेत्यांच्या संबंधांचीही चौकशी सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून करावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

विकास दुबेच्या ‘पोलीस कनेक्शन’ची एसआयटी चौकशी
लखनौ : चकमकीत ठार करण्यात आलेला गँगस्टर विकास दुबे याचे पोलिसांसमवेत नेमके कोणते संबंध होते, याची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली.
विकास दुबेसारख्या क्रूरकर्मा गुन्हेगाराचा जामीन रद्द करण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली, गुंडा अ‍ॅक्ट, रासुका, गँगस्टर कायद्यांतर्गत काय कारवाई झाली? त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात कोठे ढिसाळपणा झाला, याची चौकशी होईल.

काँग्रेसने केले उज्जैन मंदिराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण
भोपाळ : विकास दुबेला उज्जैनमधील महांकाल मंदिराच्या प्रवेशद्वारावर अटक करण्यात आली होती. त्याला याठिकाणी कट रचून शरणागती पत्करायला लावण्यात आली, असा आरोप असून, तेथे काँग्रेसने रविवारी शुद्धीकरण विधी केला. मंदिराच्या शंख द्वारावर गंगाजल शिंपडले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The ED sought details of the Vikas Dubey family's assets; Will file a money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.