पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने छापे टाकले. ईडीने सोमवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांना अटक केली. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आमदाराच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले.
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
छाप्यादरम्यान आमदाराने भिंतीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांचे फोनही घरामागील नाल्यात फेकून दिले. नंतर अधिकाऱ्यांनी हा फोन जप्त केला. छाप्याच्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये आमदार भिजत असताना ईडी आणि केंद्रीय राखीव पोलिस दल अधिकाऱ्यांनी झाडे, आणि कचरा पसरलेल्या परिसरातून घेऊन जात असल्याचे दिसत आहेृ. बुरवान विधानसभा मतदारसंघातील आमदाराला एजन्सीला सहकार्य न केल्याबद्दल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या जागेवरही छापे
आमदारांच्या काही नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले आहेत. साहा यांना २०२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरोने घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
कोलकाता उच्च न्यायालयाने गट 'क' आणि 'ड' कर्मचारी, इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.
आतापर्यंत यांना अटक
ईडीने पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी, त्यांची कथित सहकारी अर्पिता मुखर्जी, तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्यासह काही इतरांना या प्रकरणात अटक केली होती. ईडीने अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने चॅटर्जी यांना निलंबित केले. तपास यंत्रणेने आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपपत्रे दाखल केली आहेत.