अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:40 IST2025-07-25T06:39:49+5:302025-07-25T06:40:39+5:30

उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर गुरुवारी ईडीने त्यांच्याशी निगडीत मुंबईतील ३५ ठिकाणी व सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी करीत जवळपास २५ अधिकाऱ्यांची चौकशी केली.

ED raids 35 places related to Anil Ambani; no action taken at residence | अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही

अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही

मुंबई : काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर गुरुवारी ईडीने त्यांच्याशी निगडीत मुंबईतील ३५ ठिकाणी व सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी करीत जवळपास २५ अधिकाऱ्यांची चौकशी केली. पथकाकडून अनिल यांच्या निवासस्थानावर मात्र छापेमारी करण्यात आलेली नाही.

रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप कंपनीने केलेल्या कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी ही छापेमारी झाली. अंबानींच्या समूह कंपन्यांनी मनी लॉड्रिंग केल्याबाबत नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनॅन्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, बँक ऑफ बडोदा यांच्याकडील माहिती, सीबीआयकडून दाखल दोन एफआयआरच्या माहितीच्या आधारे ईडीने हे छापे मारले.

अनिल अंबानी आणि आरकॉम घोटाळेबाज
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १३ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन यांना घोटाळेबाज जाहीर केले. याप्रकरणी आता बँक सीबीआयकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहे. बँकेने कंपनीला २,२२७ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. मात्र, या कर्जाची मुद्दल आणि व्याज २६ ऑगस्ट २०१६ पासून थकीत आहे.

येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाचीही तपासणी
अंबानी यांच्या उद्योग समूहाने येस बँकेकडून २०१७ ते २०१९ या कालावधीत तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जासाठी लाचखोरी झाली, तसेच कर्जाची रक्कम काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळवत अफरातफर करण्यात आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

रिलायन्स म्हणते...
रिलायन्स पॉवर व इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी म्हटले की, ही छापेमारी जुन्या प्रकरणांशी निगडीत आहे. आमच्या कंपन्यांशी याचा संबंध नाही. कोणतीही चौकशी देखील सुरू नाही.

Web Title: ED raids 35 places related to Anil Ambani; no action taken at residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.