"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:41 IST2025-11-15T12:26:18+5:302025-11-15T13:41:47+5:30
बिहारच्या निवडणुकीत पैसे वाटल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं.

"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
Sharad Pawar on Bihar Election: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाआघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला असून विरोधकांना ५० जागांचा आकडाही गाठता आलेला नाही. भाजपने नंबर एकचा पक्ष होऊन विक्रम प्रस्थापित केला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जदयूने जोरदार मुसंडी मारली आहे. बिहारच्या या निकालांनंतर विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोप केले जात असताना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख शरद पवार यांनी या निकालावर गंभीर भाष्य केले आहे. या निकालावर भाष्य करताना पैसे वाटून निवडणुका होत असतील तर त्याचा विचार व्हायला हवा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
बिहारमधील पराभवानंतर विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर आणि मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरल्या गेलेल्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनीही या निवडणुकीआधी राबवल्या गेलेल्या योजनेवरुन सरकारला लक्ष्य केलं. महाराष्ट्रातही अशाच प्रकार पैशांचे वाटप झाल्याचे शरद पवार म्हणाले. सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जातील असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"या निवडणुकीत काही वेगळा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. पण मला अधिकृत माहिती नाही. या निकालाबाबत दोन तीन गोष्टी आहेत. या निवडणुकीत जे मतदान झालं त्याच्याविषयी मी काही लोकांशी बोललो. त्यांनी सांगितलं की या निवडणुकीत मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. मला एक शंका होती की बिहारच्या महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याचा अर्थ आहे की दहा हजार रुपये देण्याची जी योजना आहे त्याचा हा परिणाम असावा. त्याचवेळी मतदान झालं होतं. महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाटले. मताला पैसे येतात तसे नाही. अधिकृतपणे पैसे वाटले गेले. तसंच यावेळी बिहारमध्ये झालेले आहे," असे शरद पवार म्हणाले.
दहा हजार रुपये लहान रक्कम नाही - शरद पवार
"पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचं अशी भूमिका घेतली तर एकंदरीत निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करणे हे योग्य आहे का याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण दहा दहा हजार रुपये ती लहान रक्कम नाही," असेही पवार यांनी म्हटलं.