"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:04 IST2025-07-29T17:00:03+5:302025-07-29T17:04:17+5:30

पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे आहे असं म्हणत मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला.

During the debate in Rajya Sabha on Operation Sindoor Congress Mallikarjun Kharge targeted the Modi government | "दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा

"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा

Mallikarjun Kharge: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की तुम्ही चुका करता आणि इतरांना दोष देता. पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं. तसेच सरकारने सत्य ऐकण्याचे धाडस दाखवावे, चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी सभागृहात बसायला हवं, असं म्हणत खरगेंनी सरकारवर निशाणा साधला.

"पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांनाही मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही नेहमीच पाकिस्तानचा आणि दहशतवाद्यांना त्याच्या पाठिंब्याचा निषेध केला आहे आणि करत राहू. पण आम्ही त्याचा निषेध करत असतानाच पंतप्रधान मोदी एका मेजवानीला जातात आणि पाकिस्तानी पंतप्रधानांना मिठी मारतात," अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

"लोकसभेचे खासदार राहुल गांधी आणि मी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, पण पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आमची पत्रे कचऱ्याच्या पेटीत टाकली जातात. ते ती वाचतही नाहीत. जर तुमच्यात एवढा अहंकार असेल तर एक दिवस तुमचा अहंकार मोडून काढणारे लोक येतील. हे चांगले नाही. तुमच्याकडे एक-दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही. पण लोकांना मिठी मारण्यासाठी वेळ आहे," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"पाकिस्तानसोबत कोणत्या अटींवर युद्धबंदी झाली? अचानक युद्धबंदी का जाहीर करण्यात आली? कोणाच्या दबावाखाली युद्धबंदी जाहीर करण्यात आली. कोणताही देश उघडपणे भारतासोबत उभा राहिला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानावर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत. केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले आहे.पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींनी त्यांचा दौरा रद्द केला होता. मी याआधीही याचे उत्तर मागितले होते, पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मी आजही विचारत आहे की सरकारला हल्ल्याची आधीच काही माहिती होती का? जर हो, तर तुम्ही पर्यटकांना तिथे का जाऊ दिले?," असा सवाल खरगे यांनी केला.
 

Web Title: During the debate in Rajya Sabha on Operation Sindoor Congress Mallikarjun Kharge targeted the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.