Chhattisgarh Election Results: पुतण्यामुळे मुख्यमंत्री काका जेरीस, छत्तीसगडमधील पाटण मतदारसंघात अटीतटीची लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 11:49 IST2023-12-03T11:48:53+5:302023-12-03T11:49:44+5:30
Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही मोठा धक्का बसला असून, ते पाटण विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले आहे. भूपेश बघेल यांना त्यांचे पुतणे आणि भाजपा खासदार विजय बघेल यांनी कडवी टक्कर देत पिछाडीवर टाकले आहे.

Chhattisgarh Election Results: पुतण्यामुळे मुख्यमंत्री काका जेरीस, छत्तीसगडमधील पाटण मतदारसंघात अटीतटीची लढत
नुकत्याच आटोपलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील चार राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीमध्ये मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. तर छत्तीसगडमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. येथे भाजपाने अनपेक्षितपणे आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही मोठा धक्का बसला असून, ते पाटण विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले आहे. भूपेश बघेल यांना त्यांचे पुतणे आणि भाजपा खासदार विजय बघेल यांनी कडवी टक्कर देत पिछाडीवर टाकले आहे. आतापर्यंत या मतदारसंघात तीन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, त्यात विजय बघेल यांनी ४०७ मतांची आघाडी घेतली आहे.
तसेच आतापर्यंतच्या कलांच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमधील ९० जागांपैकी ८९ जागांवरील कल समोर आले असून, त्यात ४७ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर ४० जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर दोन जागांवर इतर पक्ष आघाडीवर आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवताना भाजपाचा दारुण पराभव केला होता. तसेच येथील भाजपाची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली होती.
दरम्यान, विजय बघेल हे भाजपाचे खासदार असून, त्यांनी २००८ मध्ये विधानसभा निवडणुकीत काका भूपेश बघेल यांचा पराभव केला होता.