DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:47 IST2025-11-04T15:45:00+5:302025-11-04T15:47:27+5:30
DSP Rishikant Shukla: कानपूरमधील अखिलेश दुबे प्रकरणात मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव जिल्ह्यात नियुक्त असलेल्या पोलीस उपअधीक्षक ऋषिकांत शुक्ला यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता केली गेली आहे. काय आहे त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण?

DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
Rishikant Shukla Latest News: प्रशासकीय सेवेतील अधिकारी कशा पद्धतीने लोकांकडून पैसे उकळून संपत्ती जमवत आहेत, याची प्रचिती देणाऱ्या घटना समोर येत आहेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात समोर आले आहे. एका पोलीस उपअधीक्षकाला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमावल्याचा प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याचे नाव ऋषिकांत शुक्ला आणि आतापर्यंत केलेल्या तपासातून समोर आलेली संपत्ती आहे, १०० कोटी रुपये. आणि ही संपत्ती जमवली फक्त दहा वर्षात! ही माहिती समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात खळबळ माजली. गृह विभागाने हे प्रकरण दक्षता विभागाकडे चौकशीसाठी सोपवले असून, अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजूनही याचा तपास सुरूच असून, या अधिकाऱ्याने २०० ते ३०० कोटी रुपये संपत्ती जमवली असण्याचा अंदाज आहे.
सध्या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षक ऋषिकांत शुक्लांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उपअधीक्षक
कानपूरच्या पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ऋषिकांत शुक्लांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्यातून त्यांनी भ्रष्टाचारातून जमवलेल्या संपत्तीची माहिती समोर आली.
ऋषिकांत शुक्ला हे १९९८ ते २००९ या काळात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. विशेषतः कानपूरमध्ये ते सेवेत राहिले. याच काळात त्यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संपत्ती जमवली. एसआयटीने केलेल्या चौकशीतून समोर आले की, शुक्ला यांनी घोषित उत्पन्नाच्या कितीतरी पट जास्त संपत्ती जमवली. ही संपत्ती त्यांच्या, कुटुंबातील सदस्य, जवळचे लोक आणि भागीदारांच्या नावे आहे.
अखिलेश दुबेशी संबंध
आर्यनगरमध्ये शुक्ला यांची ११ दुकाने आहेत, जे त्यांचा व्यावसायिक भागीदार देवेंद्र दुबेच्या नावावर आहेत. त्यांचा संबंध अखिलेश दुबे नावाच्या गुन्हेगारासोबत असल्याचेही समोर आले आहे. अखिलेश दुबे वकील असून, तो खोट्या केसेस दाखल करून खंडणी वसूल करणे, जमीन बळकावणारे रॅकेट चालवायचा.
२०० ते ३०० कोटी अवैध संपत्ती असल्याचा अंदाज
  
पैशांचा भस्म्या झालेल्या या ऋषिकांत शुक्ला यांनी २०० ते ३०० कोटी रुपयांची संपत्ती जमवली असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ज्या व्यक्तीने ऋषिकांत शुक्लाच्या भ्रष्टाचाराची तक्रार दिली होती, ते सौरभ भदौरिया म्हणाले, शुक्ला एसओजीमध्ये कार्यरत होते, तेव्हा ठेकेदारी, जमीन बळकावणे आणि इमारती उभारण्याच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार केला. आतापर्यंतच्या तपासात भलेही १०० कोटी रुपयांची संपत्ती समोर आली असेल, पण त्यांची एकूण संपत्ती २०० ते ३०० कोटी रुपये आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला यांनी नोएडा, पंजाब, चंदीगढसह अनेक शहरांमध्ये बेनामी संपत्ती जमवली आहे. कानपूरमधील आर्यनगरमध्ये शुक्ला यांची ११ गाळे आहेत. इतकेच नाही, तर १२ प्लॉट आहेत. शुक्लाने बिल्डरांसोबत मिलीभगत करत अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत.
ऋषिकांत शुक्ला यांचा मुलगा विशाल शुक्ला याने गुन्हेगार अखिलेश दुबे याच्यासोबत भागीदारी करून ३३ कंपन्या तयार केल्या आहेत. ज्यांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी केला जात आहे, असाही आरोप तक्रारीमध्ये आहे.