‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:07 IST2025-10-26T17:07:12+5:302025-10-26T17:07:49+5:30
Kurnool bus accident: आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे नुकत्याच झालेल्या एका भीषण बस अपघातात २० प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे नुकत्याच झालेल्या एका भीषण बस अपघातात २० प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. मद्यपान करून गाडी चालवणारे लोक हे दहशतवादीच असतात, तसेच त्यांची रस्त्यावरील वर्तणूक ही दहशतीपेक्षा कमी नसते, असे सज्जनार यांनी म्हटले आहे. दरम्यान, कुरनूल येथे झालेला बस अपघात हा साधासुधा अपघात नव्हता, तर एका मद्यधुंद दुचाकीस्वाराची बेफिकीरी आणि असंवेदनशीलतेमुळे घडलेली दुर्घटना होती. ही दुर्घटना टाळता आली असती.
हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार पुढे म्हणाले की, अपघात झाला तेव्हा दुचाकीस्वार बी. शिवशंकर हा मद्यधुंद अवस्थेत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्यानुसार त्याने रात्री २ वाजून २४ मिनिटांनी त्याच्याकडील दुचाकी पेट्रोल भरले होते. त्यानंतर काही मिनिटांतच २ वाजून ३९ मिनिटांनी त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची दुचाकी प्रवासी बसवर आदळून मोठा अपघात झाला.
सज्जनार यांनी पुढे सांगितले की, शिवशंकर याच्या मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवण्याच्या अहंकारामुळे एक भीषण दुर्घटना घडली. त्यामुळे मद्यपान करून दुचाकी चालवणारे लोक हे दहशतवादीच असतात, या माझ्या विधानावर मी ठाम आहे. हे लोक जीवन, कुटुंब आणि भविष्य बरबाद करतात. अशी कृत्य करणाऱ्यांना कधीही सहन केलं जाणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, हैदराबादमध्ये मद्यपान करून दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात झीरो टॉलरन्स धोरण लागू करण्यात आलं आहे. जी व्यक्ती मद्यपान करून वाहन चालवताना पकडली जाईल, त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या यात कुठलीही सवलत दिली जाणार नाही, असेही सज्जनार यांनी सांगितले. तसेच मद्यपान करून वाहन चालवणे ही चूक नाही तर गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्यासाठी शिक्षा अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.